शासकीय आरोग्य सेवा खासगी करण्याकडे सरकारचा कल--नितीन जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 08:20 PM2017-10-07T20:20:24+5:302017-10-07T20:22:53+5:30
सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा सर्वाधिक कल आहे.
सांगली : शासकीय यंत्रणेचे खासगीकरण करण्याकडे केंद्र आणि राज्य सरकारचा
सर्वाधिक कल आहे. थोड्याच दिवसात शासकीय आरोग्य केंद्राचेही खासगीकरण
होणार असून, तो धोका लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी आणि शासकीय यंत्रणेने
काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन साथी संस्था राज्य समन्वयक डॉ.
नितीन जाधव यांनी केले. तसेच शासकीय यंत्रणांचे वेगाने होणारे खासगीकरण
रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांनी एकत्र काम करण्याची
गरज आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व
नियोजनाची जिल्हास्तरीय कार्यशाळा जिल्हा परिषद येथे शनिवारी झाली.
यावेळी डॉ. नितीन जाधव बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम
हंकारे, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. मिलिंद पोरे, डॉ. डी. आर. पाटील,
उज्वला मोट्रे, संपदा ग्रामीण महिला (संग्राम) संस्थेचे डॉ. शशिकांत
माने, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे विनायक कुलकर्णी हे प्रमुख
उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारचे सध्या सरकारी संस्था बंद
करून त्या खासगी संस्थांकडे चालविण्यास देण्याचे धोरण आहे. केंद्र
सरकारने महिला व बालकल्याण विभागाची अंदाजपत्रकातील तरतूद ६२ टक्के कमी
केली आहे. हीच परिस्थिती आरोग्य विभागाची आहे. मेघालयात शासकीय आरोग्य
केंद्रे सामाजिक संस्थांकडे चालविण्यास दिली आहेत. मेघालयातील धोरण
महाराष्ट्रात येण्यास वेळ लागणार नाही. म्हणून वेळीच जागे होण्याची गरज
आहे. शासकीय आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाºयांनी सर्वसामान्य जनतेला
उत्तम सेवा दिली पाहिजे. शासनाच्या योजनांचा जनतेला लाभ झाला पाहिजे, या
उद्देशानेच साथी, संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था आरोग्य
सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजनाचे काम करीत आहेत. या संस्था ग्रामीण
जनतेला उत्तम आरोग्य सेवा मिळावी, यासाठीच काम करीत आहेत. याचा अर्थ
शासकीय यंत्रणेला टार्गेट करणे आणि त्रास देणे हा आमचा उद्देश नाही.
जिल्ह्यात ९० टक्के डॉक्टर चांगले काम करत असूनही केवळ १० टक्के
डॉक्टरांमुळे शासकीय आरोग्य सेवा बदनाम होते. ते थांबवायचे आहे.
डॉक्टरांच्याही काही समस्या असून, त्या आम्ही शासनाकडे मांडून
सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टरांची संख्या कमी आहे. आरोग्य
केंद्रात राहण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहे. या प्रश्नालाही आम्ही
वाचा फोडणार आहे.
पण, सर्व मूलभूत सुविधा असतानाही, रुग्णाला चांगल्या सेवा मिळत नसतील,
डॉक्टरांचा काही गैरकारभार सुरू असेल तर, त्यांनाही आम्ही पाठीशी घालणार
नाही. योग्यवेळी जनतेच्या रेट्याने आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी आम्ही
पुढाकार घेणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
संग्राम संस्थेचे शशिकांत माने यांनी संग्राम संस्थेकडून चालत असलेल्या
कामकाजाची माहिती दिली. एड्सग्रस्त व्यक्तींना उत्तम दर्जाची वैद्यकीय
सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एड्सविषयी जनजागृतीची
मोहीम राबविली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी संग्राम संस्थेचे सुलभा होवाळ, यशोदा न्यायनीत, संगीता
भिंगारदिवे, अपर्णा मुजमले, भारती भोसले, नजरीया जहिदा पखाली, शबनम
अत्तार, ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे ज्ञानू कांबळे, सिंधुताई लोंढे,
प्रशांत लोंढे, साथी संस्थेचे शकुंतला भालेराव आदी उपस्थित होते.
डॉक्टरांनी नकारात्मक भूमिका बाजूला ठेवावी : पाटील
प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी लोकाधारित देखरेख व नियोजन
समितीची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. डॉक्टरांनी शासकीय आदेशाचे
काटेकोर पालन करूनच औषध खरेदी आणि शासनाच्या योजना राबविण्याची गरज आहे.
आरोग्य केंद्रात येणाºया रुग्णाला सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन आरोग्य
सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. नकारात्मक भूमिका बाजूला
ठेवून सकारात्मक गोष्टीचा विचार करावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय
अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांनी केले.
लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट करा : डॉ. हंकारे
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
काही ठिकाणी उणिवा असतील तेथे लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था बळकट
करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. काही ठिकाणी
लोकप्रतिनिधी व अन्य घटकांचा नाहक त्रास होतो. काही डॉक्टरांचे चांगले
काम असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींचे हितसंबंध दुखावल्यामुळे त्यांना
त्रास दिला जातो. या गोष्टीही थांबल्या पाहिजेत, असे मत जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. राम हंकारे यांनी व्यक्त केले.
डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे काही ठिकाणी अडचण : गिरीगोसावी
जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरांची पदे रिक्त आहेत.
यामुळे तेथे तात्काळ वैद्यकीय सेवा देण्यात अडचणी आहेत. तरीही साथी,
संग्राम आणि ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण
जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे मत डॉ.
भूपाल गिरीगोसावी यांनी व्यक्त केले.