द्राक्षगुरूंनी घडवली बागायतीत क्रांती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:28 AM2021-03-27T04:28:18+5:302021-03-27T04:28:18+5:30
उच्चशिक्षणातील कोणतीही पदवी नसताना केवळ शेतीतील अनुभवाच्या जोरावर जिल्ह्यातील दहा द्राक्षबागायतदारांनी विविध वाण शोधून काढून त्याची गोडी सातासमुद्रापार पोहोचविली ...
उच्चशिक्षणातील कोणतीही पदवी नसताना केवळ शेतीतील अनुभवाच्या जोरावर जिल्ह्यातील दहा द्राक्षबागायतदारांनी विविध वाण शोधून काढून त्याची गोडी सातासमुद्रापार पोहोचविली आहे. द्राक्षाच्या एकरी उत्पादनात २५ ते ३० टक्के वाढही करून दाखविली आहे. कृषी वैज्ञानिक श्रीपाद दाभोलकर आणि तत्कालीन कृषी अधिकारी प्र. शं. ठाकूर यांनी द्राक्षावर केलेले अथक संशोधन आणि प्रयोगामुळेच आज सव्वालाख एकरापर्यंत द्राक्षांचे क्षेत्र गेले आहे. दाभोलकरांनी द्राक्षाच्या काडीच्या लागवडीपासून ते छाटणीपर्यंतचे आणि त्याच्या विक्रीपर्यंतचे तंत्रज्ञान शिकवले. या वैज्ञानिक द्राक्षकुलाने उत्पादित केलेली ‘तासगाव चमन’ ही सीडलेस द्राक्षे मुंबई-पुण्याच्या बाजारात आली, तेव्हा जुन्या परंपरागत लागवडीचा पायंडा मोडला गेला.
बोरगाव (ता. तासगाव) येथील सुभाष आर्वे यांनी ‘थॉमसन सीडलेस’ या जातीच्या डोळ्यांची निवड करून १९७६ मध्ये ‘तास-ए-गणेश’ वाणाचा शोध लावला. या वाणाची द्राक्षमणी लांब आणि द्राक्ष रसातील साखरेचे प्रमाणही जास्त होते. या संशोधनानंतर पुढे ४५ वर्षांत सुपर सोनाका, मारुती सिडलेस, अनुष्का, एस.एस.एन, गाेविंद, ज्योती, कृष्णा सीडलेस, अंबे सीडलेस यासह अनेक द्राक्ष वाणांचा शोध शेतकऱ्यांनीच लावला. द्राक्षाची गोडी, लांबी आणि उत्पादन वाढविण्यावर संशोधन होत आहे.
चौकट
असा शोधतात नवीन वाण
शेतकरी सर्जेराव नरुटे म्हणाले, ‘सुरुवातीला एक एकर सोनाक्का जात लावली. दरम्यान सोनाक्काचे वेगळे झाड नजरेस आले. त्यावरच पुढे तीन वर्षे काम करून चाचण्या घेतल्या. शेजारीच एक प्लॉट तयार केला. घेतलेल्या चाचण्या व या नव्या प्लॉटमधील द्राक्षघड सारखेच होते. वाणातील फरक चटकन लक्षात येत गेला. उत्पादनात ३० टक्के मोठी वाढ झाली. यातूनच ‘एस.एस.एन.’ वाणाचा शोध लागला.’
चौकट
जिल्ह्यातील द्राक्ष संशोधक
द्राक्षाचा वाण : संशोधक शेतकरी : गाव
तास-ए-गणेश सुभाष आर्वे बोरगाव (तासगाव)
मारुती सीडलेस मारुती माळी म्हैसाळ
कृष्णा सीडलेस नारायण माळी म्हैसाळ स्टेशन
अंबे सीडलेस विठ्ठल माळी बेडग
आर. के. सीडलेस रघुनाथ झांबरे डोंगरसोनी
एसएसएन सर्जेराव नरुटे सोनी
ज्योती रमेश सदाशिव माळी सोनी
गोविंद रविराज हणमंत माळी सोनी
सुपर सोनाका सावंता महादेव माळी मालगाव
अनुष्का अमोल पवार मणेराजुरी