चार हजार कोटींचा द्राक्ष उद्योग धोक्यात, द्राक्षबागायतदार कर्जबाजारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 01:06 PM2024-12-11T13:06:43+5:302024-12-11T13:07:04+5:30

सततच्या नुकसानीने ३० हजार एकर द्राक्षबागांवर कुऱ्हाड

Grape industry worth 4 thousand crores is in danger, grape growers are in debt  | चार हजार कोटींचा द्राक्ष उद्योग धोक्यात, द्राक्षबागायतदार कर्जबाजारी 

चार हजार कोटींचा द्राक्ष उद्योग धोक्यात, द्राक्षबागायतदार कर्जबाजारी 

दत्ता पाटील

तासगाव : सांगली जिल्ह्यात सुमारे ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. हवामान बदल शासनाची उदासीन भूमिका आणि सातत्याने होणारे नुकसान, यामुळे द्राक्ष बागायतदारांनी ३० हजार एकर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरुवात केली आहे. सलग चार वर्ष नुकसान झाल्यामुळे द्राक्ष बागायतदार कर्जाने बेजार झाले आहेत. त्यामुळे वर्षाला चार कोटींची उलाढाल असणारी द्राक्ष इंडस्ट्री धोक्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यात ८० हजार एकर द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. यापूर्वी सव्वा लाख एकरवर द्राक्षबाग होती. मात्र गेल्या चार वर्षात द्राक्ष बागेला सातत्याने नुकसानीचा सामना करावा लागत आहे. हवामान बदलाचे संकट दरवर्षी द्राक्ष बागेवर घोंगावत आहे. द्राक्ष बागेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात वर्षाला चार ते साडेचार हजार कोटींची उलाढाल होत आहे. द्राक्ष उत्पादनाच्या माध्यमातून सुमारे २ हजार ८०० कोटी, तर बेदाणा व्यवसायाच्या माध्यमातून दीड हजार कोटीची उलाढाल दरवर्षी होते.

द्राक्ष आणि बेदाणा इंडस्ट्रीवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाखो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र लाखोंचा पोशिंदा असलेला द्राक्ष उत्पादक सततच्या नुकसानीमुळे कोलमडून गेला आहे. शासनाची उदासीन भूमिका आणि हवामान बदलाचा फटका यामुळे द्राक्ष बागायतदारांनी द्राक्ष बागा काढण्यास सुरुवात केली आहे. मागील दोन वर्षात सुमारे ३०,००० एकरावरील द्राक्ष बागा काढून टाकल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षाऐवजी ऊस पिकाला पसंती दिल्याचे चित्र आहे.

शेती विकून कर्ज भरले

द्राक्ष बागेच्या माध्यमातून आर्थिक घडी बसवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या द्राक्ष बागायतदारांनी बँका, सोसायटीची कर्जे काढली. सततच्या नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यांना शेती विकून कर्ज भरावी लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतकी विदारक अवस्था द्राक्ष उत्पादकांची झाली आहे.

मजुरांना मिळाला रोजगार

एक एकर द्राक्ष बागेत सरासरी एक लाख रुपये मजुरीवर खर्च होतो. शिराळा येथे शेतमजुरीसाठी मजुरांना दीडशे रुपये हजेरी आहे तर द्राक्ष पट्ट्यात ४०० ते ६०० रुपये हजेरी आहे. द्राक्ष उद्योगामुळे मजुरांना इतर भागाच्या तुलनेत तीन ते चार पट मजुरी मिळत आहे. शिराळा तालुक्यात एक ट्रॉली शेणखतासाठी पंधराशे रुपये द्यावे लागतात. मात्र द्राक्ष पट्ट्यात शेणखतासाठी एका ट्रॉलीला सहा हजार रुपयांचा दर आहे.

योजना हवामान आधारित; पण पर्जन्यमापक यंत्र कुठे आहेत? 

विमा योजनेसाठी हवामान आधारित पीक विमा योजना अमलात आणली. पीक विम्याचा लाभ देताना विमा योजनेच्या कालावधीत पडलेल्या पावसाची नोंद पाहून लाभ दिला जातो. प्रत्येक महसूल मंडळात एक पर्जन्यमापक यंत्र आहे. त्याच पर्जन्यमापक यंत्रावर त्या मंडळात समावेश असणाऱ्या गावाच्या पावसाचे मोजमाप केले जाते. मात्र गेल्या चार वर्षातील निसर्गाचा लहरीपणा पाहिल्यानंतर गावाच्या एका बाजूला मुसळधार पाऊस पडला, तर गावाच्या दुसऱ्या बाजूला अजिबात पाऊस नसतो, असेच चित्र आहे. गाव तिथे हवामान केंद्र असते, तर शेतकऱ्यांच्या नुकसानीची नेमकी नोंद होणे शक्य आहे. मात्र शासनाची उदासीन भूमिका हवामान आधारित पीक विमा योजनेतील मुख्य अडसर ठरत असल्याचे दिसून येत आहे.

द्राक्षावर आधारित जिल्ह्यात होणारी उलाढाल 

द्राक्ष विक्रीतून होणारी उलाढाल - २८०० कोटी
बेदाणा व्यवसायातून होणारी उलाढाल - १५०० कोटी

पीक विमा योजनेत लाखो रुपये शेतकऱ्यांकडून भरले जात आहेत. दरवर्षी हवामान बदलाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या नुकसानीच्या मोबदला म्हणून तुटपुंजी का असेना रक्कम विमा कंपनीकडून मिळेल, अशी आशा द्राक्ष बागायतदारांना असते. प्रत्यक्षात मात्र विमा कंपनीच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्याच्या पदरात भरलेली रकमही अनेकदा येत नाही. त्यामुळे या जाचक अटींनी विमा कंपन्यांचेच हित जास्त साधले जात आहे. - अर्जुन पाटील, माजी जि. प. सदस्य.

तालुकानिहाय द्राक्षक्षेत्र (हे.)
खानापूर - १,१२५
क. महांकाळ -२,८७१
कडेगाव - २२९
पलूस - १,५६१
तासगाव -९,२३६
मिरज - ८,२६८
जत -६,९०६
वाळवा - १,२१५
आटपाडी - ३६५
एकूण - ३१,७७६

Web Title: Grape industry worth 4 thousand crores is in danger, grape growers are in debt 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.