सांगली : सकाळी ढगाळ वातावरण, दुपारनंतर उष्णता आणि रात्री थंडी, असे विचित्र वातावरण सांगलीकर सध्या अनुभवत आहेत. हवामानविषयक संकेतस्थळांनी तुरळक पावसाचीही शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पावसाचा शिडकावादेखील होणार आहे.हवामान विभागाने गुरुवारपासून तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे. सूर्यग्रहणानंतर जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊसही झाला. काही ठिकाणी दमदार सरी कोसळल्या, तर अनेक ठिकाणी शिडकावा झाला. त्यानंतर दिवसभर आभाळ ढगांनी अच्छादले. रात्रीही थंडी कमीच राहिली. शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर मात्र ऊन पडले.हवामानाच्या या बेभरवशी खेळाने द्राक्ष बागायतदारांत चिंतेचे वातावरण आहे. द्राक्ष हंगाम सुरु होण्याच्या बेतात आहे. आॅगस्टमध्ये छाटण्या घेतलेल्या पावणेचार महिन्यांच्या बागांमध्ये द्राक्षे तयार झाली आहेत. मणी मोठे झाले असून साखर भरु लागली आहे. निर्यातीच्या द्राक्षांची उतरणीही सुरु झाली आहे.
अशा स्थितीत पावसामुळे द्राक्षमणी तडकण्याची भीती आहे. घडांमध्ये पाणी साचून राहिले, तर मणी गळून पडतील. अतिवृष्टीतून शेतकऱ्यांनी हिकमतीने बागा बाहेर काढल्या, आता शेवटच्या टप्प्यात पावसाने पुन्हा घोर लावला आहे. काही शेतकऱ्यांनी अर्ली द्राक्षे बेदाणा शेडवर नेली आहेत. तापमान घसरल्याने बेदाणा निर्मितीलाही वेळ लागेल.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता द्राक्ष बागा दावण्या व करपा रोगाला बळी पडल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांना यंंदा बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे द्राक्ष उत्पादक महादेव पाटील यांनी सांगितले.