महिला काँग्रेसतर्फे ‘मदतीचा एक घास’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:25 AM2021-05-15T04:25:29+5:302021-05-15T04:25:29+5:30
सांगली : महिला काँग्रेसच्या वतीने ‘मदतीचा एक घास’ उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी ...
सांगली : महिला काँग्रेसच्या वतीने ‘मदतीचा एक घास’ उपक्रम राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्ष शैलजाभाभी पाटील यांनी दिली.
शैलजाभाभी पाटील यांनी सांगितले की, या उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन प्रदेश कार्यध्यक्ष प्रणिती शिंदे, अध्यक्ष श्रीमती संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते झाले. महिला बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, सव्वालाखे यांनी स्वतःच्या घरी पोळ्या आणि भाजी बनवून उपक्रमास सुरुवात केली. एक आई, एक बहीण, एक गृहिणी आणि अन्नपूर्णाचा वसा काँग्रेसच्याच महिला आणि नेत्या पूर्ण करू शकतात, हे त्यांनी आज दाखवून दिले.
त्या म्हणाल्या की, या उपक्रमाद्वारे आता गरजू लोकांना अन्न मिळणार आहे. घरचे जेवण, आपण घरात ज्या पोळ्या करतो त्यात रोज दहा पोळ्या जास्त करायच्या आणि वाटीभर भाजी जास्त करायची, असे ठरविले आहे. अशा ४० ते ५० पदाधिकारी महिलांनी पोळ्या आणि भाजी जमा केल्या, तर रोजच्या ४०० ते ५०० पोळ्या होतील. या आम्ही एखाद्या संस्थेला किंवा महिला आघाडीच्या नावाने लोकांना देणार आहोत. सांगलीच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या कोरोना महामारीत रुग्णांना मदत करण्यासाठी डबे आणून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन पाटील यांनी केले.