इस्लामपूर : प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तसेच राजारामबापू पाटील यांच्या सामाजिक व राजकीय जीवनातील यशस्वी कार्याच्या मागे कुसुमताई या होत्या. बापू विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी बाहेर असताना घराची तसेच संस्थांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. सर्व मुलांना योग्य संस्कार देताना त्यांच्या शिक्षणाची जबाबदारीदेखील चोखपणे बजावली म्हणूनच त्या एक ‘आदर्श माता’ म्हणून आपणा सर्वांना प्रेरणादायी आहेत, असे मत इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी व्यक्त केले.
कासेगाव शिक्षण संस्थेच्या येथील श्रीमती कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयात कुसुमताई राजारामबापू पाटील यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रज्ञा घोरपडे यांचे ‘आदर्श माता’ या विषयावर व्याख्यान झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य व कासेगाव शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. राजेंद्र कुरळपकर हे अध्यक्षस्थानी होते. सोनचाफा भित्तीपत्रिकेच्या ‘स्वातंत्र्य लढ्यातील स्त्रिया’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्राचार्य
डॉ. कुरळपकर म्हणाले, संस्थेचे मार्गदर्शक जयंत पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात एक कार्यक्षम व सुसंस्कृत नेतृत्व म्हणून ओळखले जातात. कुसुमताई पाटील यांनी त्यांच्यावर योग्य संस्कार केले. आज त्यांची पाचही अपत्य आपल्या आपल्या क्षेत्रात स्थिर स्थावर व मार्गदर्शकांच्या भूमिकेत आहेत.
प्रा. डॉ. रमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. सुरेश साळवे यांनी आभार मानले. प्रा. डी. ए. पाटील, प्रा. बी. एस. जाधव, विलास गिरीगोसावी, प्रा. डॉ. युवराज केंगार, प्रा. डॉ. स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या.