आटूगडेवाडीत कोरोनाचा वाढता कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:54+5:302021-04-22T04:26:54+5:30
कोकरुड : आटूगडेवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील रुग्ण संख्येत वाढ असल्यानेही वाडी हॉटस्पॉटच्या दिशेने चालली आहे. आरोग्य विभाग आणि ...
कोकरुड : आटूगडेवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील रुग्ण संख्येत वाढ असल्यानेही वाडी हॉटस्पॉटच्या दिशेने चालली आहे. आरोग्य विभाग आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत उपाय करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सहा महिन्यांनंतर पुन्हा पंधरा दिवसांपूर्वी वाडीत झालेल्या लग्नाच्या निमित्ताने कोरोनाची सुरुवात झाली आहे. लग्नासाठी आलेल्या नातेवाईक मंडळींमार्फत पहिला रुग्ण आटूगडेवाडीमध्ये आढळून आल्याचे ग्रामस्थांतून बोलले जात आहे. पहिला रुग्ण लग्नमालकाच्या घरी सापडला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील, भावकीतील, शेजारील असे करीत तीनशे लोकसंख्या असलेल्या या वाडीत पंधरा दिवसांत कोरोनाची रुग्ण संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे.
कोकरूड येथील ग्रामीण रुग्णालयात पाचजणांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर १३ जण घरी विलगीकरणात आहेत. अजूनही सहा लोकांचे चाचणी बाकी आहेत. सध्या आटूगडेवाडी येथे साखळी निर्माण झाल्याने पाचच्या पटीत रुग्ण संख्या आढळत असल्याने हॉटस्पॉट दिशेने वाटचाल सुरू आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायतीमार्फत योग्य ती खबरदारी घेऊन औषध फवारणी करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे काम डॉ. राहुल बाबर, आरोग्यसेविका चंदा महाडिक, संगीता कांबळे करीत आहेत.