तोफा थंडावल्या, मतदानासाठी प्रशासन सज्ज

By admin | Published: October 30, 2015 11:50 PM2015-10-30T23:50:11+5:302015-10-31T00:09:38+5:30

रविवारी मतदान : मतदार ‘कॅश’ करण्यासाठी आता दोन रात्रींचा खेळ; बंदोबस्त तैनात--ग्रामपंचायत निवडणूक

Guns stopped, ready for administration for voting | तोफा थंडावल्या, मतदानासाठी प्रशासन सज्ज

तोफा थंडावल्या, मतदानासाठी प्रशासन सज्ज

Next

सांगली/तासगाव : जिल्ह्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. एकूण ६०० जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे.एकूण ३३६ मतदान केंद्रे तयार असून, तासगाव तालुक्यातील १९५, पलूस तालुक्यातील ९०, जत तालुक्यातील १९, कवठेमहांकाळ तालुक्यातील ६, कडेगाव तालुक्यात २, तर खानापूर तालुक्यातील २० मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. यासाठी १६८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून १००८ केंद्र निरीक्षकांचा समावेश आहे. याशिवाय ४ पोलीस उपअधीक्षक, ७०० पोलीस, ४०० गृहरक्षक दलाचे जवान व दोन राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
तासगाव तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींसाठी रविवार, दि. १ रोजी मतदान होणार आहे. १६२ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी ८१० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहा गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारी पूर्ण झाली असून निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तासगावचे तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली.
तालुक्यातील ३९ पैकी ३ गावे बिनविरोध झाली आहेत. उर्वरित ३६ ग्रामपंचायतीत रविवारी मतदान होणार आहे. एकूण ३५८ जागांसाठी ८३३ उमेदवार रिंगणात आहेत. १३६ प्रभागांसाठी १६२ मतदान केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी आणि एक शिपाई, याप्रमाणे एकूण ८१० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी १६ विशेष पथकांची नियुक्ती केलेली आहे.
सर्वच गावांत अटीतटीच्या लढती होत असल्या तरी, प्रशासनाकडून तालुक्यातील सहा गावे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या गावांमध्ये येळावी, सावळज, विसापूर, बोरगाव, मांजर्डे, हातनूर आणि कवठेएकंद या गावांचा समावेश आहे.
संवेदनशील गावांत जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मतदान शांततेत व्हावे, यासाठी या गावांत सर्वपक्षीय बैठका घेतलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन तहसीलदार सुधाकर भोसले यांनी केले. (वार्ताहर)


शेवटचा दिवस : प्रचाराचा धडाका
तासगाव : तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या प्रचाराच्या तोफा शुक्रवारी सायंकाळी थंडावल्या. मतदानासाठी एक दिवसाचा अवधी असल्याने काटावरच्या मतदारांना ‘कॅश’करण्यासाठी दोन रात्रींचा खेळ चांगलाच रंगणार आहे. निवडणुकीच्या काळात काही गावांत तणावपूर्ण परिस्थिती असल्याचेही दिसून येत असून, पोलीस यंत्रणाही सज्ज आहे. तासगाव तालुक्यातील ३९ पैकी ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित ३९ ग्रामपंचायतीत शुक्रवारी प्रचाराची सांगता झाली. ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ होताना दिसून येत आहे.


खानापूर तालुक्यात
चार जागांसाठी पोटनिवडणूक
विटा : खानापूर तालुक्यातील साळशिंगे, शेडगेवाडी व भडके वाडी या तीन ग्रापंचायतींसाठी पोटनिवडणूक होत असून, चार जागांसाठी आठ उमेदवार रिंगणात आहेत. साळशिंगेत एक, शेडगेवाडीत दोन, तर भडकेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

उमराणीत तिरंगी लढत
जत : तालुक्यातील उमराणी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटना अशी तिरंगी निवडणूक होत आहे. तेरा जागांसाठी ४० उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य मल्लेश कत्ती यांची मागील दहा वर्षांपासून येथे सत्ता आहे. माजी सरपंच आप्पासाहेब नामद यांनी ग्रामपंचायतीत संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. आप्पासाहेब नामद व मल्लेश कत्ती यांच्या नाराज कार्यकर्त्यांना घेऊन दुंडाप्पा बिराजदार यांनी पॅनल उभे केल्याने चुरस वाढली आहे.

Web Title: Guns stopped, ready for administration for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.