सांगली : येथील सांगली कोल्हापूर रस्त्यावरील अंकली चेकपोस्टवर सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटखा तस्करी करणारा ट्रक सांगली ग्रामीण पोलिसांनी पकडला. १४ लाख ८१ हजाराची तंबाखू, पानमसाला, गुटखा आणि सात लाखाचा ट्रक असा २१ लाख ८१ हजार ९२० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ट्रक चालक अस्लम सलीम मुजावर (वय ३५, रा. शंभरफुटी रस्ता, विनायकनगर) याला अटक केली. तर मालक इर्शाद मुलाणी (रा. ख्वाजा कॉलनी, सांगली) हा पसार झाला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सुचनेनुसार सांगली-कोल्हापूर रस्त्यावर अंकली येथे आंतरजिल्हा चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहे. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याकडील कर्मचारी रमेश पाटील व पथक येथे कार्यरत असताना शनिवारी मिरजेकडून सांगलीकडे येणारा ट्रक (एमएच ५०-७४२९) बाबत संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. चालकाने पलायनाचा प्रयत्न करण्यापूर्वीच त्याला रोखले.ट्रकमधील मालाची तपासणी केली. तेव्हा चार पोती भरून असलेला ९६ हजार ८०० रूपयाची तंबाखू, २० खोकी भरून असलेला ८ लाख ७१ हजार २०० रूपयाचा पानमसाला, १ लाख ४४ हजार रूपयाची सुगंधी तंबाखू, ७७ हजार ७९२ रूपयाचा केशरयुक्त पानमसाला, १२ हजार ४८० रूपयाची केशरयुक्त तंबाखू, ४९ हजार ९२० रूपयाचा केशरयुक्त पानमसाला, १३ हजार ७२८ रूपयाची तंबाखू तसेच ७ लाखाचा ट्रक असा २१ लाख ८१ हजार ९२० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे, सहायक निरीक्षक प्रियंका बाबर, परिविक्षाधीन उपनिरीक्षक नितीन बाबर, कर्मचारी इस्माईल तांबोळी, महेश जाधव, रमेश पाटील, हिम्मत शेख, असिफ नदाफ, सतीश सातपुते यांच्या पथकाने ही कारवाई केली.याप्रकरणी पोलिस कर्मचारी रमेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. चालक मुजावर व मालक मुलाणी या दोघांविरूद्ध गुन्हा दाखळ केला आहे. मुजावर याला १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मोठी कारवाईआचारसंहिता लागू झाल्यापासून चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळेच प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, पानमसाला, गुटख्यासह तब्बल २१ लाख ८१ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आचारसंहिता काळातील ही पहिली मोठी कारवाई ठरली.