सांगली : केंद्र सरकारने हॉलमार्कचा कायदा करताना सराफांना चोर समजूनच केला आहे. सरकारने यामाध्यमातून बिझनेसचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयीन लढाई लढू, असा इशारा महाराष्ट्र सराफ फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेसिंह रांका यांनी शनिवारी सांगलीतील सराफांच्या मेळाव्यात दिला.सांगली जिल्हा सराफ समितीच्यावतीने येथील दैवज्ञ भवनात शनिवारी सायंकाळी सराफांचा मेळावा पार पडला. यावेळी फत्तेचंद रांका यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शास्त्रज्ञ आणि ब्युरो आॅफ इंडियन स्टँन्डर्सचे अध्यक्ष संजय कुमार यांनी हॉलमार्क कायद्याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी राज्य सराफ फेडरेशनचे उपाध्यक्ष किशोर पंडित, जिल्हाध्यक्ष जितेंद्र पेंडूरकर, राजाभाऊ वार्इंकर, बाबूराव जोग, वडगावचे नगराध्यक्ष मोहन माळी, सिध्दार्थ गाडगीळ, पंढरीनाथ माळी, भूषण जोशी आदी उपस्थित होते.रांका म्हणाले की, हॉलमार्कला राज्यातील सराफांचा विरोध नाही, मात्र ज्यापद्धतीने हा कायदा आणला गेला, ती पद्धत चुकीची आहे. सराफांच्या अडचणींचा विचार केला गेला नाही. हा कायदा करण्यामागे राजकारण आहे. हॉलमार्क केंद्रचालक संघटनेचा मंत्र्यांवर मोठा दबाव असल्याचे आम्हाला जाणवत आहे. त्यामुळे आमची बाजू ऐकून घेतली नाही.ते म्हणाले की, नीती आयोगाने हॉलमार्कवर वीस पानांचा अहवाल दिला आहे. त्यांच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत चुकीच्या माहितीच्या आधारे हा कायदा केला गेला आहे. भारतात उत्तम प्रतीचे सोने असताना, या कायद्याची गरजच काय? सर्वच कॅरेटच्या सोन्यावर हॉलमार्क हवे.
नव्या प्रणालीतून शासनाला सुमारे दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. शासनाने या माध्यमातून व्यवसाय करण्याचा प्रयत्न करू नये.संजय कुमार यांनी सर्व सराफ व्यावसायिकांना हॉलमार्क कायदा बंधनकारक आहे, असे स्पष्ट केले. यावेळी बाबूराव जोग यांनी स्वागत, तर जितेंद्र पेंडूरकर यांनी प्रास्ताविक केले.