मिरज : मिरजेतील महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या बैठकीस महापौर व आयुक्त उशिरा आल्याच्या कारणावरून काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने बैठक रद्द करण्यात आली. काँग्रेस व राष्ट्रवादी नगरसेवकांनी महापालिका प्रवेशव्दारात घोषणा देत प्रशासनाचा निषेध केला.
महापालिका प्रशासनातर्फे मिरजेतील महापालिका कार्यालयात बुधवारी दुपारी एक वाजता आरोग्य व पाणीपुरवठा विभागाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस सर्व नगरसेवक वेळेवर उपस्थित होते; मात्र महापौर संगीता खोत व आयुक्त रवींद्र खेबूडकर बैठकीस सुमारे दीड तास उशिरा आले. महापौर व आयुक्त वेळेवर न आल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. महापालिकेच्या प्रवेशद्वारात पायरीवर बसून नगरसेवकांनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर म्हणाले, आयुक्तांना आरोग्य विषयाच्या बैठकीचे गांभीर्य नाही. सर्व नगरसेवक बैठकीसाठी दीड तास ताटकळत असताना, आयुक्त व महापौर उशिरा आल्याचा जाहीर निषेध करत बैठकीवर आम्ही बहिष्कार टाकला आहे. उत्तम साखळकर, संजय मेंढे, बबिता मेंढे, करण जामदार, वर्षा निंबाळकर, कांचन कांबळे, मृणाल पाटील, प्रकाश मुळके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मैनुद्दीन बागवान, विष्णू माने, अतहर नायकवडी, नर्गीस सय्यद, रझिया काजी, दिग्विजय सूर्यवंशी या विरोधी नगरसेवकांच्या बहिष्कारामुळे बैठक रद्द करण्यात आली.
पालिका आयुक्त खेबूडकर म्हणाले, सांगलीत घरपट्टीविषयक महत्त्वाची बैठक सुरू होती. त्या बैठकीला उशीर झाल्याने मिरजेत येण्यास उशीर झाला. मी आल्यानंतर सर्व नगरसेवकांची माफी मागितल्यानंतरही त्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. यामुळे रद्द झालेली आरोग्य विभागाची बैठक शुक्रवारी दुपारी एक वाजता होणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.खड्ड्यांचे शुल्क माफगणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांना रस्त्यावर मंडप उभारणीसाठी खुदाई शुल्क माफ करण्याची आमदारांनी घोषणा केल्यानंतरही खुदाईचे शुल्क भरून घेत असल्याबद्दल भाजपचे निरंजन आवटी यांनी आयुक्तांना जाब विचारला. महासभेत निर्णय झाल्याशिवाय खड्ड्यांचे शुल्क माफ करता येणार नाही. असा आयुक्तांनी पवित्रा घेतल्याने आ. सुरेश खाडे महापालिकेत आले. आ. खाडे यांनी रस्ते दुरूस्तीसाठी महापालिकेस निधी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर खड्ड्यांचे शुल्क माफ करण्याचा निर्णय झाला.