भेटीगाठीसोबतच मदतही आटली, वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:27 AM2021-04-20T04:27:07+5:302021-04-20T04:27:07+5:30
फोटो आहे... लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोराेनाने सामाजिक जीवनातील अनेक रंगांचा बेरंग केला असताना, त्याचे परिणाम आता वृद्धाश्रमावरही ...
फोटो आहे...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोराेनाने सामाजिक जीवनातील अनेक रंगांचा बेरंग केला असताना, त्याचे परिणाम आता वृद्धाश्रमावरही झाले आहेत. वाढत्या संसर्गामुळे याठिकाणची मदत आटली असून मनोरंजनाचे कार्यक्रम, भेटीगाठी या कार्यक्रमांनाही विराम मिळाल्याने आश्रमातील आजी-आजोबा एकाकी पडले आहेत.
कुपवाड येथील वृद्ध सेवाश्रमातील आजी-आजोबांना वातावरणात एकदम बदल जाणवतोय. आश्रमाच्या शीतल छायेत कधी निराधारपणाची जाणीव त्यांना होत नाही. प्रेम, आपुलकी, माया याबरोबरच जोडलेल्या नात्यांमुळे कधीही ते निराधारपणाच्या नकारात्मक अंधारात जात नाहीत. कोरोनामुळे मात्र त्यांच्याकडे हा एकाकीपणा चालत येत आहे. एरवी आश्रमात भजन, विनोदी कार्यक्रम, प्रवचन, व्याख्यान, गाणी अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. अनेक लोक या ना त्या निमित्ताने आश्रमात येत असतात, मात्र कोरोनामुळे ही पावले थांबली आहेत. त्यामुळे अचानक एकाकीपणाची भावना आजी-आजोबांमध्ये जागृत होत आहे.
चौकट
कुपवाड वृद्धाश्रमातील एकूण सदस्य ५०
स्त्रिया २७
पुरुष २३
चौकट
मदत ५० टक्के घटली
कोरोनामुळे वस्तू, अन्नपदार्थांच्या माध्यमातून होणाऱ्या मदतीत जवळपास ५० टक्के घट झाली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे नेहमी मदत करणाऱ्या लोकांची पावले थांबली आहेत. आपल्यामुळे दुसऱ्यांना व दुसऱ्यामुळे आपल्याला कोरोना होऊ नये, हा योग्य हेतू अनेकांचा आहे. तरीही त्यामुळे येणारी मदत थांबली आहे.
चौकट
आजी-आजोबांसह कर्मचाऱ्यांवरही बंधने
कोरोनामुळे आश्रमाबाहेर फिरायला जाण्यास आजी-आजोबांवर बंधने आहेत, शिवाय येथील कर्मचाऱ्यांनीही बाहेरच्या व्यक्तींच्या फारसे संपर्कात न येण्याची सतर्कता बाळगली आहे. त्यामुळे कोरोनाच्या माध्यमातून एक ठराविक चौकट तयार झाली आहे.
चौकट
मन रमते संवादात
स्वकीयांच्या आठवणी, उणिवा दूर करण्यासाठी आश्रमातील आजी-आजोबा एकमेकांशी संवाद साधून मन हलके करतात. येथील कर्मचाऱ्यांशीही त्यांचे नाते तयार झाल्याने त्यांच्याशीही ते मनमोकळी बातचीत करतात.
चौकट
भेट देणारे शून्यावर
कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा मदतीच्या निमित्ताने येणाऱ्यांचे प्रमाण् कोरोनामुळे शून्यावर आले आहे. त्यामुळे आश्रमातील ज्येष्ठांना चुकल्यासारखे वाटत आहे. नेहमी दिसणारे चेहरेही दूर झाले आहेत.
चौकट
यांनी साधला संवाद...
बाहेरील व्यक्तींशी थांबलेल्या संवादाची उणीव आश्रमाच्या व्यवस्थापिका सौ. रेखा माळी, आप्पासाहेब वाले, नीलम चांदणे, लता झांबरे, शारदा लोंढे आदी कर्मचाऱ्यांनी भरून काढण्यास सुरुवात केली आहे. तेच आता या ज्येष्ठांशी मुक्तसंवाद साधतात.
चौकट
लस हवीय, पण आधार नाही
येथील अनेक ज्येष्ठांना लसीकरण करायचे आहे, मात्र निराधार असलेल्या अनेकांकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांचे लसीकरण थांबले आहे.