लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : माधवनगर रोडवरील वसंत बझारच्या समोरच्या संपत चौकाच्या नावाला जागेच्या लढ्याचा इतिहास आहे. खणभाग परिसरातील हिंदू-मुस्लिम चौकाला सामाजिक, हिराबागला वास्तूचा तर बदाम चौकाला पत्त्यांच्या डावाचा इतिहास लाभला आहे.
संपत चौक हे नाव ॲड. संपत पाटील यांच्यामुळे पडले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे ते सहकारी होते. या चाैकात अनेक वर्षे राहणाऱ्या लोकांचा व तत्कालीन संस्थांचा जागेच्या मालकीवरून वाद सुरू होता. लोकांच्या बाजूने पाटील यांनी न्यायालयीन लढा दिला. त्यांनी या लढ्यात लोकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे त्यांचे नाव या चौकाला देण्यात आले.
हिराबाग चौकाचे नाव हे त्याठिकाणच्या बागेवरून पडले. अजूनही हिराबाग त्याठिकाणी अस्तित्वात आहे. त्यावरून नगरपालिकेच्या वॉटर वर्क्सलाही हिराबाग नाव पडले. त्याचठिकाणी पुन्हा हिराबाग गणपती मंडळ, चॅरिटेबल ट्रस्टही सुरू झाले. हिराबागचा गणपतीही प्रसिद्ध आहे. सांगली हे बागांचे शहर होते. त्यामुळे अनेक भागांना बागांचे नाव लागले आहे. विश्रामबाग, हिराबाग ही नावेही त्याठिकाणच्या बागांवरूनच पुढे आली.
हिंदू-मुस्लिम चौकाचे नाव या परिसरात राखलेल्या सामाजिक सलोख्यामुळे पडले. येथे दोन्ही धर्मीयांची वस्ती मोठी आहे. मराठी व उर्दू शाळाही येथे आहेत. त्यामुळे या चौकाच्या नावाला सामाजिक इतिहास आहे. याच रस्त्यावर कत्तलखान्यापासून काही अंतरावरील बदाम चौक हे नाव पत्त्यांच्या डावामुळे पडले. बदामचा पत्ता जिंकणाऱ्याची निशाणी होती. त्याचबरोबर येथे पूर्वी एक कट्टाही बदाम आकारात बांधला होता. त्यावरून या चौकाचे नाव बदाम चौक पडल्याची माहिती इतिहासाचे अभ्यासक विजय बक्षी यांनी दिली.