प्रचारासाठी ‘गृहमंत्री’ उतरल्या मैदानात!
By admin | Published: October 8, 2014 10:03 PM2014-10-08T22:03:28+5:302014-10-08T23:02:26+5:30
उमेदवारांचा भार हलका : महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; घरोघरी संपर्क अभियान सुरू
सांगली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने आता वेग घेतला आहे. कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, याचा प्रत्येक उमेदवार गांभीर्याने विचार करीत आहे. नेमक्या याचवेळी काही उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ मैदानात उतरल्या आहेत आणि प्रचाराची धुरा समर्थपणे खांद्यावर घेतली आहे.
निवडणुकीत महिलांची मते महत्त्वाची ठरणार असल्याने महिला मतदारांशी संपर्क साधण्यासाठी बहुतांशी उमेदवारांनी स्वतंत्र महिला मंडळच कार्यान्वित केले आहे. त्यांचे घरोघरी संपर्क अभियान सुरू आहे. असे असले तरी गाफील न राहता, काही उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ मात्र प्रचाराकरिता स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. जतमध्ये काट्याची लढत आहे. तेथे प्रमुख तीन उमेदवारांच्या ‘गृहमंत्री’ प्रचारात सक्रिय आहेत. यामध्ये भाजपचे विलासराव जगताप यांच्या पत्नी उर्मिलाताई, काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्या पत्नी वर्षाताई आणि राष्ट्रवादीचे प्रकाश शेंडगे यांच्या पत्नी रेणुकाताई यांचा समावेश आहे. शिराळा मतदारसंघात भाजपचे शिवाजीराव नाईक यांच्या पत्नी सुनंदाताई, काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांच्या पत्नी रेणुकादेवी आणि राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक यांच्या पत्नी सुनीतादेवी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे. खानापूर मतदारसंघातही शिवसेनेचे अनिल बाबर यांच्या पत्नी शोभाताई, काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई आणि राष्ट्रवादीचे अमरसिंह देशमुख यांच्या पत्नी सुषमादेवी यांनी नियोजनबध्दरित्या प्रचार सुरू केला आहे. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात भाजपचे अजितराव घोरपडे यांच्या पत्नी जयमाला यांनीदेखील प्रचारात लक्ष घातले आहे. सांगलीमध्ये काँग्रेसचे मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई यांनी घरोघरी संपर्क साधण्याला महत्त्व दिले आहे. (वार्ताहर)
कुटुंब रंगलंय प्रचारात
बहुतांशी उमेदवारांच्या केवळ ‘गृहमंत्री’ नव्हे, तर संपूर्ण कुटुंबच प्रचारकार्यात रंगल्याचे चित्र आहे. उमेदवारांच्या घरी अनेक कार्यकर्त्यांचा राबता असतो. प्रचार करून थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी चहा- पाणी, नाष्टा प्रसंगी भोजन व्यवस्था पाहण्याचे कार्य कुटुंबातील सदस्य करत आहेत.
हळदी-कुंकू, प्रचारफेऱ्या...
महिला मतदारांशी संवाद साधण्यासाठी उमेदवारांच्या ‘गृह’मंत्र्यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मतदारसंघात ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजित करण्यात येत आहे. सकाळ, संध्याकाळ पदयात्रा काढण्यात येत आहेत. कोपरा सभांचेही आयोजन करण्यात येत आहे.