सांगली : शासनाने हॉटेल्सवर निर्बंध लादल्याने शहरात अडीच हजाराहून अधिक स्वयंपाकी महिलांचा रोजगार हिरावला आहे. हॉटेल्स बंद झाल्याने त्यांच्यापुढे चरितार्थाची समस्या उभी ठाकली आहे. व्यवसाय नसल्याने हॉटेलचालकांचाही निरुपाय झाला आहे.
गेल्या मार्चपासून नोव्हेंबरपर्यंत घरात बसून काढल्यानंतर डिसेंबरपासून परिस्थितीत काहीशी सुधारणा झाली होती. हॉटेल्स सुरू झाल्याने महिलांना काम मिळाले होते. मार्चमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्यानंतर हॉटेल्सवर निर्बंध आले. परिणामी महिलांवर घरी बसण्याची वेळ आली. हॉटेल्सबरोबरच ढाबे, खानावळी येथेही महिलांना काम मिळते. अनेक महिला घरातच भाकरी व चपातीच्या ऑर्डर्स घेतात. पार्ट्यांसाठी घरातून मांसाहारी मेनू बनवून देतात. ही सारी उलाढाल आता थांबली आहे. हॉटेल्स व ढाब्यांमध्ये स्वयंपाकासाठी पुरुष काम करीत असले तरी चपाती व भाकरीसाठी महिलांना पर्याय नसतो. धुण्याभांड्यांसाठीही महिला घेतल्या जातात. या सर्वांना हॉटेलमालकांनी आता विश्रांती दिली आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांत हॉटेलांचा व्यवसाय शंभर टक्के पूर्ववत झालेला नव्हता, तरीही काही प्रमाणात रोजगार मिळाला होता. सध्या पार्सलने तोदेखील हिरावला आहे. चपाती-भाकरीसाठी एक-दोन महिला पुरेशा ठरतात. पार्सल सेवेमुळे भांडी धुण्यासाठी महिलांची गरज राहिलेली नाही.
चौकट
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक
- हॉटेलमालकांनी सुुरुवातीला काही दिवस अर्धा पगार दिला, त्यावरच घरखर्च कसाबसा चालविला. लॉकडाऊन लांबले तसे अर्धा पगारही मिळायचा बंद झाला.
- महिलांना रेशनवर मिळणाऱ्या गहू-तांदळावर दिवस काढावे लागले. काहींना जनधन योजनेत जमा होणाऱ्या पैशांची तुटपुंजी मदत झाली. काहींनी भाजीपाला विक्री सुरू केली.
- दिवाळीसारखे सणही साजरे करता आले नाहीत. रोजगाराची हमी नसल्याने उधार-उसनवारही मिळत नव्हती. घरातील कर्ते पुरुषही रोजगाराविना बसून राहिल्याने परिस्थिती गंभीर होती. मोलकरणी म्हणूनही कामे मिळाली नाहीत.
कोट
लॉकडाऊनमध्ये मालकांनी अर्धा पगार सुरू ठेवल्याने घरखर्चाला हातभार लागला; पण हे पैसे कधी ना कधी फेडावेच लागणार आहेत. खानावळ पुन्हा सुुरू झाल्याने रोजगार मिळाला होता; पण आता पुन्हा घरी बसावे लागत आहे.
- शोभा सावंत, स्वयंपाकी महिला, मिरज
कोट
ढाब्यावर चपाती, भाकरी करीत होते. गेले वर्षभर ढाबे बंद झाल्याने काम बंद झाले. मालकाकडून थोडे पैसे अंगावर घेतले आहेत. ते अजून परत केले नाहीत. घरात पापड-चटण्या करून कसाबसा खर्च चालविला. पैशांअभावी घराचे वीजबिलदेखील भरले नाही.
- वैजयंता कांबळे, स्वयंपाकी महिला, सांगली
कोट
खानावळ बंद झाल्यावर सुरुवातीला घरातूनच चपात्या व डबे देण्याचा प्रयत्न केला; पण परगावचे ग्राहक लॉकडाऊनमध्ये निघून गेल्याने डबे बंद झाले. मध्यंतरी भाजीपाला विक्रीचा व्यवसायही केला. जानेवारीपासून पुन्हा स्वयंपाकाचे काम मिळाले होते. सध्या फक्त पार्सलला परवानगी असल्याने अर्ध्या पगारावर काम करीत आहे.
- द्रौपदी होवाळे, सांगली
पॉईंटर्स
शहरातील हॉटेल्स संख्या - सुमारे दीड हजार
या हॉटेल्समध्ये पोळीभाजी करणाऱ्या महिलांची संख्या - सुमारे अडीच हजार