खाकी वर्दीतील माणुसकीने जपला समुपदेशनातून संवाद सेतू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:18 AM2021-01-01T04:18:56+5:302021-01-01T04:18:56+5:30

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : संसार म्हणजे दोनचाकी गाडाच...एकाला जरी विसंवादाची कीड लागली, तर संसाराचा गाडा ...

Humanity in khaki uniform bridges the gap through counseling! | खाकी वर्दीतील माणुसकीने जपला समुपदेशनातून संवाद सेतू!

खाकी वर्दीतील माणुसकीने जपला समुपदेशनातून संवाद सेतू!

Next

शरद जाधव / लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : संसार म्हणजे दोनचाकी गाडाच...एकाला जरी विसंवादाची कीड लागली, तर संसाराचा गाडा डगमगलाच म्हणून समजा...याच विसंवादातून कौटुंबिक वाद थेट पोलिसांच्या दारात जातात आणि सुरू होते त्या कुटुंबाची.. कुटुंबातील चिमुकल्यांची होरपळ. ही परवड ओळखून पोलिसांनी कौटुंबिक वादासंदर्भात कायद्यापेक्षा वायद्याला महत्त्व देत समुपदेशन करत कुटुंब पुन्हा उभे राहील, यासाठी पुढाकार घेतला आहे. खाकी वर्दीतील माणुसकीने जपलेल्या या संवाद सेतूने अनेकांचे संसार पुन्हा नव्याने फुलले आहेत.

एक काळ होता की, कोर्टाची आणि पोलीस ठाण्याची पायरी चढणे म्हणजे दिव्य समजले जात असे. आता मात्र अगदी क्षुल्लक कारणावरूनही घरातील भांडणे पोलिसात पोहोचत आहेत. अनेक प्रकरणे केवळ पोलिसांपर्यंत न थांबता न्यायालयात जात असल्याने छोट्याशा कारणावरून कुटुंबात निर्माण झालेला विसंवाद कुटुंब उद‌्ध्वस्त करत आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलातील महिला कक्षातर्फे समुदेशनाव्दारे समस्यांवर तोडगा काढला जातो. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी याबाबत निर्देश देत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रश्न सोडवले जात आहेत. त्यामुळे एक अथवा दुसऱ्या समुपदेशन चर्चेतूनच अनेकांचे वाद मिटत आहेत व त्यांचा संसार रूळाला लागत आहे.

चौकट

केवळ नवरा-बायकोमधील नव्हे, तर घरातील सासू-सुना, आई-वडील यांच्यातील वादावरही संवादातून उपाय शोधले जात आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात कक्षाकडे १५० हून अधिक तक्रारी आल्या असतानाही त्यातील १०० हून अधिक प्रकरणे समुपदेशनव्दारे मिटवली गेली आहेत. त्यामुळे पोलीस म्हणजे केवळ कायद्याचा धाक, ही प्रतिमा बाजूला राहत समुपदेशनातून साधणारा संवाद सेतूच्या भूमिकेत पोलीस दिसत आहेत.

Web Title: Humanity in khaki uniform bridges the gap through counseling!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.