हरिकन्स, स्फूर्ती आणि नरसिंहचे दमदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:33 AM2021-02-17T04:33:24+5:302021-02-17T04:33:24+5:30
इस्लामपूर : पहिल्या दिवसापासून क्षणाे-क्षणी उत्कंठा वाढविणारा आणि श्वास रोखायला लावणारा अप्रतिम खेळ, प्रो-कबड्डी व महा कबड्डीसारखे शिस्तबध्द नियोजन, ...
इस्लामपूर : पहिल्या दिवसापासून क्षणाे-क्षणी उत्कंठा वाढविणारा आणि श्वास रोखायला लावणारा अप्रतिम खेळ, प्रो-कबड्डी व महा कबड्डीसारखे शिस्तबध्द नियोजन, मुबईच्या किशोर गावडे यांचे प्रभावी समालोचन, आकर्षक प्रकाशझोत आणि स्थानिक वाहिनीवरून थेट प्रक्षेपण यामुळे येथील जयंत प्रीमियर लीगला कबड्डीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सांगली जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने ही लीग सुरू आहे. येथील निनाईनगरमधील जयंत स्पोर्ट्सच्या मैदानावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या प्रयत्नातून ही लीग आयोजित केली आहे.
पहिल्या सामन्यात कासेगावचे उद्योजक अतुल लाहिगडे यांच्या शरद लाहिगडे हरिकन्सने कामेरीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्या जगदीश पाटील रायडर्स या संघावर मात केली. हरिकन्सने पूर्वार्ध व उत्तरार्धात प्रतिस्पर्धी संघावर एक-एक लोन चढवीत ५४ गुणांची लूट केली.
दुसऱ्या सामन्यात जुनेखेडचे सागर पाटील, नितीन कोळगे यांच्या स्फूर्ती रॉयल्स विरुध्द वाळव्याचे रवींद्र पाटील यांच्या राजेंद्र पाटील युवा फायटर्स, तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचा राजारामबापू पाटील ईगल्स विरुध्द जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, कृष्णाचे माजी संचालक ब्रह्मनंद यांचा नरसिंह चॅलेंर्स (तांबवे) या संघातील सामने प्रत्येक चढाईला उत्कटता वाढविणारे ठरले.
स्फूर्ती रॉयल्सने ३ गुणांनी, तर नरसिंह टायगर्सने २ गुणांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघावर मात केली. कबड्डीप्रेमींच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पहिल्याचदिवशी अगदी रात्री उशिरापर्यंत सामने चालले.
सागर जाधव, उमेश रासनकर, विजय देसाई, माजी नगरसेवक आयुब हवलदार, सचिन कोळी, स्वरूप मोरे, अंकुश जाधव, राजवर्धन लाड, हमीद लांडगे, जयकर पाटील, साखराळे, प्रसाद कुलकर्णी, अजय थोरात, विजय महाडिक यांच्यासह जयंत स्पोर्ट्सचे खेळाडू व कार्यकर्ते स्पर्धेचे संयोजन करीत आहेत.
थेट प्रक्षेपण..!
इस्लामपूर येथील स्थानिक वाहिनीवरून या कबड्डी लीगचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. वाळवा, आष्टा, संपूर्ण शिराळा, पलूस तसेच तासगाव तालुक्यातील काही गावात हे प्रक्षेपण दिसत आहे.
फोटो : १६ इस्लामपूर १
ओळी : इस्लामपूर येथील जयंत प्रिमियर कबड्डी लीगमधील सामन्यातील एक क्षण.