शेती हवी पण नवरा शेतकरी नको!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:27 AM2021-03-16T04:27:11+5:302021-03-16T04:27:11+5:30

सांगली : लग्नाच्या बाजारात मुलींच्या वाढत्या अपेक्षा वरपित्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शेतकरी नवरा नको हा ट्रेण्ड अजूनही पहिल्या क्रमांकावर ...

I want agriculture but I don't want a husband farmer! | शेती हवी पण नवरा शेतकरी नको!

शेती हवी पण नवरा शेतकरी नको!

Next

सांगली : लग्नाच्या बाजारात मुलींच्या वाढत्या अपेक्षा वरपित्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. शेतकरी नवरा नको हा ट्रेण्ड अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. गावाकडचे सासर नको ही अट दुसऱ्या क्रमांकावर, तर खासगी नोकरी चालेल, व्यावसायिक नको हा ट्रेण्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

लग्नाच्या बाजारात वधू-वर संस्था, पालक आणि तरुणांकडून कानोसा घेतला असता मुलींच्या वाढत्या अपेक्षा स्पष्ट झाल्या. उच्च शिक्षण घेणाच्या मुलींना भावी पतीविषयी अपेक्षादेखील उच्च दर्जाच्याच आहेत. परदेशस्थ नोकरी करणाऱ्या तरुणांना मुलीसोबत वधुपित्याचीही प्राधान्याने पसंती मिळत आहेे. मुलगी नशीब काढतेय या आनंदाबरोबरच आपलीही भविष्यात कधीतरी फॉरेन टूर होईल असा धोरणी व्यावहारिक हिशेब यामागे दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत तरुण पिढी शेतीत मोठ्या प्रमाणात गुंतली आहे. पारंपरिक शेतीला मागे टाकत नवनव्या यंत्रांच्या मदतीने आधुनिक शेती करीत आहे. बागायती पिकांमधून लाखो रुपये मिळवत आहेत. बुलेटवरून रुबाबात जाणारा शेतकऱ्याचा मुलगा मुलीची पसंती मात्र मिळवू शकत नाही. वधू-वर सूचक संस्था चालविणाऱ्या व्यावसायिकांनी अनुभव सांगितला की, शेतीची अपेक्षा केली जाते, पण शेतात जाण्याची मुलीची तयारी नसते. एक स्थावर म्हणून त्याकडे पाहिले जाते. भविष्यात अडचणीच्या प्रसंगी ती विकून पैसा उभा करता येईल असा सोयीचा विचार वधूपिते करीत आहेत.

डॉक्टर, इंजिनिअर, सरकारी व खासगी नोकरदार यांना मुलींची पसंती आहे. मुलाची दहा-वीस एकर बागायत शेती असतानाही त्याला केवळ नोकरी नाही म्हणून स्थळे नाकारली जात आहेत. याला कंटाळलेले व लग्नाचे वय उलटून चाललेले तरुण लाखोंचे उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे पाठ फिरवताहेत. केवळ लग्नासाठी दहा-पंधरा हजारांच्या खासगी नोकरीवर शहरांकडे धाव घेत आहेत.

चौकट

डॉक्टर नवरा हवा!

सर्वाधिक मागणी डॉक्टरला आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि स्थिर जीवन यामुळे डॉक्टरांचा भाव बराच वधारला आहे. पण डॉक्टर तरुणांची भलतीच टंचाई असल्याचे विवाह संस्थांच्या संयोजकांनी सांगितले. डॉक्टर तरुणांची पसंती डॉक्टर मुलीलाच असते, त्यामुळे डॉक्टर जावई मिळण्यासाठी वधूपित्यांना बराच खटाटोप करावा लागतो.

चौकट

तरच पुढे बोलू...!

मुलाविषयी मुलींच्या वाढत्या अपेक्षा वरपित्याला मेटाकुटीला आणत आहेत. मुलगी शिकलेय, लग्नानंतर नोकरीला परवानगी देणार असाल तर पुढचा विचार करू असा खडा सुरुवातीलाच टाकला जातो. अर्थात लग्नानंतर दोघेही पुण्या-मुंबईला नोकरी करतील आणि स्वतंत्र राहतील असा सुप्त सूर त्यामागे असतो. मुलाचे आई-वडील ग्रामीण भागातील मुलीला चालण्यासारखे असले तरी शहरी मानसिकता बदलत असल्याचा अनुभव आहे. राजा-राणीच्या संसारात सासू-सासऱ्यांची अडचण नको असाही सूर आहे. मुलगा शहरात नोकरी करत असेल तर लग्नानंतर त्याचे गावाकडचे दोर कापून टाकले जातील याची तयारी लग्नापूर्वीच केली जाते.

कोट

मुलींच्या अपेक्षा पूर्ण करणारी मुले शोधताना आमची दमछाक होत आहे. पाच दिवसांचा आठवडा आणि दोन दिवसांची विश्रांती ही सरकारी मानसिकता विवाहेच्छु मुलींमध्ये लोकप्रिय झाली आहे. वर्षाकाठी लाखो रुपये मिळवूनही शेतकरी मुलाला नकार ऐकावा मिळत आहे. मुली शिकू लागल्याने त्यांच्या अपेक्षाही वाढल्यात. अगदी ९०-९५ टक्के मुली शेतकरी तरुणांना नाकारत असल्याचे अनुभव आहेत.

- निलेश भंडारे, वधू-वर सूचक मंडळाचे संचालक.

कोट

मुलींच्या अपेक्षा वाढताहेत, पण त्यांना आवर घालण्याची जबाबदारी पालकांची आहे. कर्तृत्ववान शेतकरी मुलगाही नोकरदाराला मागे टाकण्याइतपत उत्पन्न मिळवितो. खासगी नोकऱ्या आयुष्यभर पुरणाऱ्या नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. पुण्या-मुंबईच्या नोकरदार मुलांना मुली लगेच पसंती देतात, पण लग्नानंतर काही दिवसांतच त्यांचा विरस झाल्याचा अनुभ‌व येतो.

- सुवर्णा गोरे, वधू-वर सूचक मंडळ संचालिका

कोट

शिकलेल्या मुली गावाकडे राहण्यास तयार नसतात. हल्ली मुलींना अधिकाधिक शिकविण्यावर वडिलांचा भर असतो. या मुली शहरातील किंवा परदेशातील मुलाला पसंती देतात. शेतकरी मुलगा गडगंज असला तरी नाके मुरडतात. वधू-वर सूचक मंडळ चालविताना मुलींच्या अनेक अपेक्षांचा सामना करावा लागतो.

- बाळकृष्ण सखदेव, वधू-वर सूचक मंडळ संचालक

कोट

पाच एकर बागायत शेती आहे. त्यातील एक एकर द्राक्षबाग आणि दोन एकर ऊस आहे. मुलगा शिकलेला व एकुलता असूनही त्याच्या लग्नात अडचणी येताहेत. लग्नासाठी म्हणून मुलाने एमआयडीसीत नोकरी पत्करली. त्यानंतर एक-दोन स्थळे सांगून आली आहेत.

- भीमराव कोरे, वरपिता, खटाव

कोट

मुलीचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे, त्यामुळे तिचा कल नोकरी करण्याकडे आहे. नात्यातला सधन शेतकरी मुलगा सांगून आला, आमचीही सहमती होती, पण मुलीला शहरातील नोकरदार मुलगा हवा आहे. स्थळाचा शोध सुरू आहे.

- रंगराव कोळी, वधूपिता, नरवाड

Web Title: I want agriculture but I don't want a husband farmer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.