राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आणि राज्यातील एकंदर सद्य:स्थितीचा विचार करता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेब आज हवे होते, अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात वारंवार येत राहते. जयंती आणि स्मृतिदिनीच नव्हे तर पलूस-कडेगाव मतदारसंघात झालेली हरितक्रांती आणि विकासकामे पाहता क्षणाक्षणाला साहेबांच्या आठवणी ताज्या होतात. डॉ. पतंगराव कदम साहेब यांचे पुत्र आणि विद्यमान सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे वडिलांचा वारसा खंबीरपणे चालवताना दिसतात. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांत तोच उत्साह दिसून येतो.
डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी
साखर कारखाना परिसरात जाऊन स्मारकाचे दर्शन घेणारे आणि आदरणीय साहेबांपासून प्रेरणा घेणारे
कार्यकर्ते लक्षणीय आहेत. याखेरीज साहेबांना मानणारा मोठा वर्ग पलूस कडेगावच नव्हे, तर सांगली जिल्ह्यात आणि राज्यातही आहे. राज्याच्या विकासासाठी साहेबांनी घेतलेली भूमिका आणि आघाडी शासनाच्या काळात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय सदैव स्मरणात राहतील. पलूस-कडेगाव मतदारसंघात विधानसभा निवडणूक लागली की खांद्यावर हाताच्या चिन्हांची पट्टी टाकून ‘हा आवाज कुणाचा, सोनसळच्या वाघाचा’ अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दुमदुमायचा.
पलूस-कडेगाव
मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी साहेबांचा दरारा आणि प्रेम, आपुलकी प्रत्यक्ष अनुभवली. साहेबांच्या या आपुलकीने एका हाकेवर मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र यायचे.
राज्यात आता महाविकास आघाडीची सत्ता आहे. यात डॉ. विश्वजित कदम राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक त्यांचेही साहेबांप्रमाणेच पलूस-कडेगाव मतदारसंघाकडे लक्ष आहे. मतदारसंघातील जनतेला साहेबांची उणीव भासू नये यासाठी ते धीरोदात्तपणे मनातील दुःख बाजूला ठेवून साहेबांच्या
माघारी माझी जबाबदारी म्हणून काम करीत आहेत. साहेबांप्रमाणेच सत्तेची फळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्षमपणे व जबाबदारीने काम करीत आहेत.
ताकारी आणि टेंभू या सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात हरितक्रांती झाली. आता हा मतदारसंघ
विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून नावारूपाला आणणार अशी ग्वाही साहेबांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दिली होती. यानंतर भाजप-शिवसेना युतीकडे सत्ता होती. आता
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या
महाविकास आघाडीची सत्ता आहे. यामुळे आता राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम हे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोणाचेही कसलेही व्यक्तिगत किंवा सार्वजनिक काम असले तरी माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम साहेब सगळ्या कामांचा जागेवर निपटारा करायचे. यामुळे साहेब आणि सामान्य जनता यांच्यात खूप जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे नाते निर्माण झाले होते.
राज्याच्या राजकरणातदेखील साहेबांना अन्यन्यसाधारण महत्त्व होते. साहेब माणसात रमणारे दिग्गज नेते तर होतेच; पण सर्वसामान्य व गोरगरीब जनतेसाठी देवमाणूस होते. साहेबांच्या भोवती वेगवेगळ्या कामानिमित्त येणाऱ्या लोकांचा नेहमीच गराडा असायचा. मात्र, प्रत्येकाला साहेब भेटायचे. मला वेळ नाही असे साहेब कधीच म्हणत नव्हते. सामान्य जनतेचे काम कितीही मोठ्या अधिकाऱ्याकडे, नेत्याकडे किंवा अन्य कोणाकडे असले तरी लागलीच ‘लावरे त्यांना फोन’ हे शब्द साहेबांच्या तोंडून निघायचे आणि त्याच क्षणी आपले काम झाले अशी त्या माणसाची खात्री व्हायची. इतक्यात फोनही व्हायचा आणि ‘तुझं काम झाले’ असे साहेबच सांगूनही टाकायचे. समोरील व्यक्तीला साहेब हे आपले नेते तर आहेतच; पण माणसातला देव आहेत याचा साक्षात्कार व्हायचा.
लोकांच्या कामासाठी त्यांचे प्रश्न
सोडविण्यासाठी तात्काळ फोन लावून काम करण्याच्या साहेबांच्या कार्यशैलीमुळे दररोज शेकडो लोकांची शासन दरबारी असलेली कामे पटापट मार्गी लागायची. साहेबांनी हजारो तरुणांना नोकऱ्या देऊन त्यांचे संसार फुलविले. कित्येक आजारी रुग्णांना मोफत उपचार दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न
सुटले. शेती पिकांना सिंचन योजनांचे पाणी वेळेत दिले. गोरगरिबांच्या मुलांना शाळा, कॉलेजात प्रवेश दिले, नोकरदारांच्या सोयीच्या ठिकाणी बदल्या केल्या.
कित्येक लोकांना संकटात मदत झाली. हे सगळे शब्दांत मांडता येणे अशक्य आहे. इतके मोठे काम साहेबांनी केले. पलूस-कडेगाव मतदारसंघातील जनतेशी सतत संपर्क ठेवून जनतेच्याच कामात साहेब सतत व्यस्त असायचे.
गोरगरिबांच्या सुख-दुःखात साहेबांनी
दाखविलेल्या आपलेपणामुळे सर्वसामान्य जनतेने साहेबांवर भरभरून प्रेम केले. साहेब जनतेच्या अडीअडचणीत नेहमीच धावून येत होते. सातत्याने मतदारसंघातील गावांना भेटी देऊन लोकांची विचारपूस करीत होते. काँग्रेस व आघाडी शासनाच्या काळात साहेब सलग १५ वर्षे
कॅबिनेट मंत्री होते. साहेबांचे राजकारण आणि समाजकारण अफलातून होते, त्याला तोड नाही. कडेगावमध्ये जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडवायचे. अगदी विरोधक जरी साहेबांकडे काम घेऊन आला तरी त्याला ‘तू माझाच माणूस आहेस, काय काम बोल’ असे साहेब म्हणायचे. त्यामुळे विरोधकांनाही साहेबांचे आकर्षण वाटायचे. साहेबांच्या आपुलकीच्या बोलण्यामुळे जनता नेहमीच त्यांच्यासोबत राहिली. साहेबांनी स्थानिक राजकारणातही
लक्ष घालून जुन्या आणि नव्या पिढीतील कार्यकर्त्यांची मोट बांधली. साहेब त्यांच्या राजकीय कारकीर्दीत कधीही कुठेही डगमगले नाहीत, कारण मतदारसंघातील जनतेची मोठी ताकद त्यांच्या मागे होती.
मतदारसंघातील सामान्य जनतेमध्ये साहेबांविषयी खूप आपुलकी होती. आपले साहेब मुख्यमंत्री व्हावेत हीच भावना लोकांच्या मनात सातत्याने राहिली. साहेब मुख्यमंत्री झाले नाहीत; पण राज्याच्या राजकारणात, समाजकारणात त्यांना फार मोठे स्थान होते. साहेबांची राजकीय ताकद आणि साहेबांचा दबदबा हाच येथील जनतेचा अभिमान होता.
घाट माथ्यावरच्या दुष्काळी भागात कृष्णेचे पाणी आणणार आणि कोरडवाहू शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणार हा जनतेला दिलेला शब्द साहेबांनी पाळला, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी साहेबांवर जिवापाड प्रेम केले.
साहेबांनी पूर्वीच्या भिलवडी-वांगी आणि आताच्या पलूस-कडेगाव मतदारसंघाचे ३० वर्षे आमदार आणि त्यातील २० वर्षे राज्याच्या मंत्रिमंडळात प्रभावी कामगिरी केली. भारती विद्यापीठ आणि सोनहिरा कारखाना, तसेच संलग्न संस्थांमधून त्यांनी गोरगरीब कुटुंबातील हजारो तरुणांना नोकरीच्या संधी दिल्या. भारती विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब कुटुंबातील मुलांची कोट्यवधींची फी त्यांनी माफ केली. त्यांनी कधीही आपला आणि विरोधक असा दुजाभाव केला नाही. म्हणूनच सर्वांना वाटते साहेब आज हवे होते.