सांगली : गेल्या दोन महिन्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या वेगाने वाढली असून, यामध्ये अनेक रुग्णांवर उपचारादरम्यान रेमडेसिविर आणि स्टेरॉईडचा वापर करण्यात येत आहे. मात्र ज्या रुग्णांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा काही रग्णांमध्ये फंगल इन्फेक्शनसह इतर काही आजारांचा धोका वाढला आहे.
कोविड रुग्णांनी उपचार सुरू होण्यापूर्वी तसेच कोविडमधून बरे झाल्यावरही विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्टेराॅईड व रेमडेसिविरच्या वापराबाबतही सूचना दिल्या आहेत. सर्वसामान्य व्यक्तींच्या तुलनेत जे लोक दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत, अशा रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येतात. या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी उपचारादरम्यान प्रभावी औषध म्हणून रेमडेसिविर तसेच स्टेरॉईडचा वापर केला जातो. या उपचारातून अनेक रुग्णांनी कोविडवर मात केली आहे, मात्र काही रुग्णांवर त्याचा विपरित परिणामही झाल्याचे दिसून येत आहे.
हे दुष्परिणाम प्रामुख्याने मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये, तसेच ज्या रुग्णांमध्ये स्टेरॉईडच्या वापरादरम्यान शुगर वाढल्याची समस्या उद्भवली, अशाच रुग्णांमध्ये जाणवली. फंगल इन्फेक्शनचा धोका याच माध्यमातून होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा कोविडच्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच डॉक्टरांना त्यांच्या विविध आजारांविषयी माहिती देणे गरजेचे आहे.
रेमडेसिविरचे साईड इफेक्ट
रेमडेसिविर हे कोविड रुग्णांसाठी संजीवनी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याचेही काही साईड इफेक्ट समोर आले आहेत. रेमडेसिविर हे लिव्हर फंक्शन, किडनी आणि हृदयाचे कार्य प्रभावित करते. त्यामुळेच डॉक्टर रुग्णाला रेमडेसिविर देण्यापूर्वी रुग्णांच्या लिव्हर फंक्शनसोबतच किडनी क्रियेटिनीनचे निरीक्षण करतात. या निरीक्षणानंतरच डॉक्टर रुग्णांना रेमडेसिविर देतात. रेमडेसिविरमुळे अनेकदा रुग्णाच्या हृदयाचे ठोके कमी पडतात.
स्टेरॉईडचे साईड इफेक्ट
स्टेरॉईडच्या वापरामुळे ज्या व्यक्तीला शुगरची समस्या नाही, अशा रुग्णाचीही शुगर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहदेखील होऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर तीन ते चार वेळा रुग्णाच्या शुगरचे निरीक्षण करतात. याशिवाय, स्टेरॉईडमुळे किडनीवर तसेच रक्तदाब, शरीरावर सूज येणे आदी लक्षणे दिसू लागतात. तसेच काळी बुरशी म्हणजेच फंगल इन्फेक्शनची समस्यादेखील उद्भवू शकते. हा आजार डोळ्यांसह नाकाचे हाड आणि मेंदूपर्यंत पोहोचू शकतो.
कोट
त्वचेवर पुरळ उठणे, फंगल इन्फेक्शन, केस गळती यासारखे दुष्परिणाम स्टेरॉईडच्या अतिवापराने होऊ शकतात. गेले वर्षभर अशा तक्रारी असलेले अनेक रुग्ण आमच्याकडे आले होते. याचे प्रमाण वाढले आहे. रेमडेसिविर व स्टेरॉईडच्या वापराबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. दयानंद नाईक, त्वचारोग तज्ज्ञ
कोट
रेमडेसिविरच्या वापराबाबत आम्ही डॉक्टरांना वारंवार सूचना देत आहोत. गरज नसताना त्याचा वापर होऊ नये, याची दक्षता घेतली जात आहे. क्लिनिकल ट्रायल नसल्याने त्याच्या फायद्या-तोट्याबाबत अद्याप कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक, सांगली