निवडणुकीत गडबड केली तर गाठ पोलिसांशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 12:16 PM2019-10-01T12:16:44+5:302019-10-01T12:21:38+5:30
गेल्या ७ वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या वाळवा, शिराळा तालुक्यातील २४२ फाळकूट दादांचा बाजार भरवत, विधानसभा निवडणूक कालावधित गडबड केली तर पोलिसांशी गाठ आहे, असा सज्जड दम पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भरला. यातील काही गुंडांना पोलिसांचा आवाज दाखवत त्यांनी इतरांच्या नाड्या आवळल्या.
इस्लामपूर : गेल्या ७ वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर असणाऱ्या वाळवा, शिराळा तालुक्यातील २४२ फाळकूट दादांचा बाजार भरवत, विधानसभा निवडणूक कालावधित गडबड केली तर पोलिसांशी गाठ आहे, असा सज्जड दम पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी भरला. यातील काही गुंडांना पोलिसांचा आवाज दाखवत त्यांनी इतरांच्या नाड्या आवळल्या.
येथील उपअधीक्षक कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ७ वर्षांपासून विविध गुन्हे करत पोलिसांच्या रेकॉर्डवर राहिलेल्या इस्लामपूरच्या (१४६), आष्टा (४७), कासेगाव (१२), कुरळप (१0), शिराळा (२४), कोकरुड (३) अशा ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील २४२ फाळकूट दादांचा आदान—प्रदान कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये मारामारीविरूद्ध व मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या संशयितांचा समावेश होता.
सुरुल सोसायटी, पेठ, हुबालवाडी, नवेखेड, जुनेखेड ग्रामपंचायत, कोरेगाव ग्रामपंचायत, शिगाव जि. प. निवडणूक, वाळवा जि. प. निवडणूक, मागील विधानसभा निवडणुकीत तांदुळवाडीत झालेली मारामारी, शिराळा तालुक्यात कांदे, चिखलवाडी, अस्वलेवाडी, शिराळे खुर्द या ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीवेळी दाखल गुन्ह्यातील संशयितांना पिंगळे यांनी कठोर शब्दात सुनावले.
वरील सर्व आरोपींना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काळासाठी हद्दपार करण्याच्या हालचाली पोलीस वर्तुळात सुरु आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्या आदेशाने आणि पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदान—प्रदान उपक्रम झाला.
यावेळी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, आष्ट्याचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, शिराळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, कुरळपचे सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे, कासेगावचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, कोकरूडचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम आणि उपअधीक्षक कार्यालयातील वाचक पोलीस उपनिरीक्षक इसाक चौगुले उपस्थित होते.