बेकायदा गांजाशेती पुन्हा फोफावतेय ! जत : कायदे कडक, अंमलबजावणीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:34 AM2018-03-11T00:34:48+5:302018-03-11T00:34:48+5:30
संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
गजानन पाटील ।
संख : कर्नाटकात उपलब्ध असणारी बाजारपेठ, कमी कष्टात मिळणारा पैसा, यामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यामध्ये गांजाचे पीक आजही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. उमदी पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोरबगी येथे दोन लाख ९८ हजार, लमाणतांडा माणिकनाळ येथे १४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. ही २००४ आणि २०१५ नंतरची ही सर्वांत मोठी कारवाई होती. त्यामुळे तालुक्यातील गांजाचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आला आहे.
सीमाभागातील अनेक गावांत ऊस, मका, बाजरी, तूर, ज्वारी या पिकाअंतर्गत गांजा पिकाची लागवड केली जात आहे. हे पीक सात ते आठ महिन्यांत येते. एका एकरामध्ये चारशे झाडांची लागवड केली जाते. एका झाडापासून १० ते १५ किलो गांजा मिळतो. एकरी आठ ते दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. झाडांची लावण करताना गोपनियता पाळली जाते.
गांजा शेतीच्या चोहोबाजूला उसाची किंवा तुरीची झाडे लावतात. त्यामुळे सहजासहजी कोणाचाही ते लक्षात येत नाही. पीक परिपक्व झाल्यानंतर त्याची पाने तोडून वाळत घातली जातात. कोणतीही प्रक्रिया न करताच गांजा तयार होतो व त्याची तस्करी होते. बाजारात योग्य भाव नसेल तर कडब्याच्या गंजीत गांजा लपवून ठेवतात. कर्नाटकातील विजापूर, धारवाड, गुलबर्गा, जमखंडी, सोलापूर, सांगली, पुणे, बारामती, आदी ठिकाणी गांजाचे पार्सल पाठविण्यात येते.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग, जत, उमदी पोलिसांकडून अनेकवेळा धाडी टाकल्या आहेत. आरोपींना मुद्देमालासह पकडूनसुद्धा एकाही आरोपीला शिक्षा झाली नाही. गांजा पकडण्यासाठी महसूल खात्यातील सक्षम अधिकारी घेऊन धाडी टाकणे बंधनकारक असताना एकाही धाडसत्रात महसूल अधिकाºयाचा समावेश केला जात नाही. हा वादाचा मुद्दा ठरू श्कतो. साक्षीदार पंच म्हणून ठराविक व्यक्तीची निवड केली जाते. त्यामुळेच कारवाईची जरब कमी झाली नाही.
छाप्यातून लाखोंचा माल जप्त
माजी पोलीसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे यांनी २००४ मध्ये केलेल्या करवाईत तिकोंडी येथे चार लाख २६ हजार, तर उमदीचे पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांनी गिरगाव येथे १४० किलो गांजा पकडला. पांडोझरी येथे १५० किलो १ लाख १५० रुपये किमतीचा, तर तिकोंडी येथे ८ किलो गांजा पकडला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुरेश पवार व पोलीस निरीक्षक सतीश पळसदेवकर यांनी २००३ मध्ये दोन ट्रकसह ६६ लाख रुपयांचा गांजा हस्तगत केला होता. तर चंद्रकांत श्ंिदे यांनी तिकोंडीतून १७५ किलो गांजा पकडला होता. २०१५ मध्ये गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पाच्छापूर व दरीबडची येथे ४२ लाख ७० हजारांचा गांजा पकडला होता.
पाच वर्षांनंतर मोठी कारवाई
२०१२ मध्ये उमदी पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शशिकांत गोडसे यांनी सोनलगी येथे गांजा पकडला होता. त्यानंतर गेली पाच वर्षे कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. नूतन पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मोरबगी येथे दोन लाख ९८ हजार, लमाणतांडा, माणिकनाळ येथे १४ हजार ७५० रुपये किमतीचा गांजा पकडला. या महिन्यातील ही सर्वांत मोठी धाडसी कारवाई केली आहे.
पीक नोंदी वादात
पीकपाणी नोंदी घालण्याचे काम गावकामगार तलाठी करतो. पीक नोंदी कार्यालयात बसून न करता प्रत्यक्षात प्लॉटवर जाऊन करावी, असा नियम आहे; परंतु तसे केले जात नाही. त्यामुळे शेतात कोणत्या पिकांची लागवड केली आहे, हे समजत नाही.