सांगली महापालिकेच्या स्थायी सभेत बजेट फाडले; पाण्यासाठी सदस्याचा सभात्याग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 12:27 PM2023-04-19T12:27:06+5:302023-04-19T12:29:15+5:30
सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप
सांगली : महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंगळवारी काँग्रेस सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. स्थायी समितीकडून यंदाच्या अंदाजपत्रकाला विलंब झाल्याच्या निषेधार्थ नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रशासनाचे बजेट फाडले तर नगरसेवक फिरोज पठाण यांनी रमामातानगरमधील पिण्याच्या पाण्याची समस्या न सोडविल्याने सभात्याग केला. अखेर सभापती धीरज सूर्यवंशी यांनी नवीन जलवाहिनी टाकण्याचे आदेश देत पठाण यांना सभात्याग मागे घेण्यास भाग पाडले.
स्थायी समितीची सभा सभापती सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत काँग्रेसचे सदस्य आक्रमक होते. सभेच्या सुरूवातीलाच फिरोज पठाण यांनी रमामातानगर, सहारा चौक, शमु पटेल गल्ली, माने गल्लीसह नऊ गल्ल्यांत चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी येत नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागाने रस्त्यावर खड्डे काढले पण तेही मुजविलेले नाही. रमजान ईद तोंडावर असून तातडीने मार्ग काढा, अशी मागणी करत सभेचे कामकाज रोखून धरले. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न आल्याने त्यांनी सभात्याग केला. पण सभापतींनी त्यांना रोखत तातडीने ठेकेदाराला बोलावून घेतले. या परिसरातील नागरिकांसाठी नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्याचे आदेश दिले.
काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी अंदाजपत्रकाला विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. ३१ मार्चपूर्वी अंदाजपत्रक महासभेकडून मंजूर होणे अपेक्षित होते. पण अद्यापही अंदाजपत्रक तयार झालेले नाही. त्यात प्रशासनाने आयुक्तांच्या अंदाजपत्रकानुसार निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. बजेटपूर्वी प्रशासनाकडून गतवर्षीचा जमा-खर्चाचे विवरणपत्रही स्थायीकडे आलेले नाही. सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप करत त्यांनी सभेत आयुक्तांचे अंदाजपत्रक फाडले. सभापतींनी येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रक महापौरांकडे देणार असल्याचे सांगितले.
स्वच्छता निरीक्षकांना नोटीस
महापालिकेकडून नवीन शौचालयासाठी अनुदान दिले जाते. पण सध्या अनुदान बंद असल्याचे स्वच्छता निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रस्ताव दाखल होत नसल्याची बाब नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापतींनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना नोटीस काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले तसेच नवीन शौचालयासाठी अनुदान वाटप सुरू असून नागरिकांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले.