पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:23 PM2018-03-10T23:23:12+5:302018-03-10T23:23:12+5:30

Inauguration of the Sangli Service Center: Dnyaneshwar Mulay | पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे

पासपोर्टची प्रक्रिया सुकर करणार, सांगलीत सेवा केंद्राचे उद्घाटन : ज्ञानेश्वर मुळे

Next
ठळक मुद्दे सांगलीत पोस्ट कार्यालयात सेवा केंद्राचे उद्घाटन

सांगली : सध्या असलेल्या पॅनकार्ड आणि आधारकार्ड इतकीच पासपोर्टचीही प्रक्रिया सुकर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी येथे केले.

येथील प्रधान पोस्ट कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कॉँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली अर्पण करून अत्यंत साध्या पद्धतीने केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुळे म्हणाले की, विदेशी सेवेत रुजू झाल्यापासूनच आपल्या भागातील लोकांची सेवा करण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न आता पूर्ण झाले असून, कोल्हापूरनंतर सांगलीतही पासपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशातील १६५ वे केंद्र सांगलीत सुरू झाले आहे. पासपोर्टसाठी पूर्वीप्रमाणे कीचकट कागदपत्रे रद्द करण्यात आली असून, आता कमीत कमी व नागरिकांना सहज उपलब्ध होतील अशा कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट काढता येणार आहे. पासपोर्टच्या प्रक्रियेत पोलीस तपासणीची पद्धत थोडी त्रासदायक ठरत असली, तरी पोलीस प्रशासनाशी संवाद साधत ती अधिक सोयीची करण्यावर भर देणार आहे. यावेळी नीता केळकर, जयंत वैशंपायन, एन. विनोदकुमार, विनोद कुटे, शशिकांत नरके, जतिन पोटे उपस्थित होते.

सांगलीचे ऋणानुबंध दृढ
मुळे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यात माझे गाव असले तरी जन्म सांगली जिल्ह्यातील आरग येथे झाला आहे. तसेच महाविद्यालयीन जीवनात मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालय, बायसिंगर ग्रंथालय, विलिंग्डन कॉलेज येथे भाषण स्पर्धा गाजविल्या आहेत. लिखाणासाठी म. द. हातकणंगलेकर यांनी मार्गदर्शन केले असल्याने सांगलीशी विशेष ऋणानुबंध आहेत. ते बंध या केंद्रामुळे अधिक दृढ झाले आहेत.
 

पतंगरावांना आदरांजली
कार्यक्रम नियोजित असल्याने सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या निधनामुळे त्यांना आदरांजली अर्पण करून साध्या पध्दतीने कार्यक्रम झाला. खा. संजयकाका पाटील व आम. सुधीर गाडगीळ यांनीही कदम यांना श्रध्दांजली अर्पण करून कार्यक्रमात सहभाग घेतला नाही.

सांगलीत शनिवारी पोस्ट कार्यालयात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर मुळे, शशिकांत नरके, जतीन पोटे, जयंत वैशंपायन, एन. विनोदकुमार, ए. के. नाईक उपस्थित होते.

Web Title: Inauguration of the Sangli Service Center: Dnyaneshwar Mulay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.