कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. गृहविलगीकरणास परवानगी न देता त्यांना जिल्हा परिषद शाळेतील विलगीकरण कक्षातच ठेवावे तरच कोरोना बाधित रुग्णांची संख्या आटोक्यात येईल. त्याचबरोबर बाधितांच्या संपर्कातील व सर्व व्यावसायिकांच्या तातडीने अँटिजन टेस्ट करून संभाव्य बाधित रुग्ण शोधण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने आशा व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने काम करावे अशा सूचना काेराेना दक्षता समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.
गावात ४०० पेक्षा जास्त रुग्ण होऊनही मृत्यूदर कमी ठेवण्यात कामेरी ग्रामपंचायत प्रशासन, दक्षता कमिटी व प्राथमिक आरोग्य केंद्राला यश आले आहे. मात्र रुग्णसंख्या कमी करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. यावेळी प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात राहणाऱ्या रुग्णांची मोफत जेवणाची व्यवस्था करणाऱ्या सुनील पाटील, माजी उपसरपंच तानाजी माने, माजी सरपंच अशोक कुंभार यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्याप्रमाणे इतर दानशूर व्यक्तींनी बधितांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. यावेळी पाेलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, उपनिरीक्षक अशोक जाधव, सरपंच स्वप्नाली जाधव, दक्षता समिती ज्येष्ठ सदस्य सुनील पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष नंदूकाका पाटील, संग्राम पाटील, तलाठी आर. बी. शिंदे, दिनेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, किरण नांगरे, पोपट कुंभार, कोतवाल अशोक ठोंबरे, संजय पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन चिवटे उपस्थित होते.