सततच्या लॉकडाऊनमुळे वाढविले मुलांचे वजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:24 AM2021-03-25T04:24:56+5:302021-03-25T04:24:56+5:30
सांगली : अनेक महिन्यांचा लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा व अन्य कारणांमुळे मुलांच्या शारीरिक हालचाली जवळपास थंडावल्या आहेत. त्यामुळे मुलांमधील स्थूलतेचे ...
सांगली : अनेक महिन्यांचा लॉकडाऊन, ऑनलाईन शाळा व अन्य कारणांमुळे मुलांच्या शारीरिक हालचाली जवळपास थंडावल्या आहेत. त्यामुळे मुलांमधील स्थूलतेचे प्रमाण सध्या वाढत आहे. बालरोगतज्ज्ञांच्या मते ग्रामीण व शहरी भागात नेहमीच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट झाले आहे. त्यामुळे पालकांनी याबाबत अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
जागतिक स्तरावरसुद्धा मुलांमधील स्थूलता हा चिंतेचा विषय बनला आहे. अमेरिकेच्या स्प्रिंगर या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, कोविड महामारीच्या काळात चालूवर्षी जगातील १५ कोटी ८० लाख मुले स्थूलतेने ग्रासली जातील. भारतातही परिस्थिती वेगळी नाही. जिल्ह्यातील स्थानिक वैद्यकीय तज्ज्ञांनीही लहान मुलांमधील स्थूलता वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
मुलांनी हे करावे...
दिवसातून काही वेळ मैदानात किंवा घरच्या घरी शारीरिक हालचाली वाढविणारे खेळ खेळावेत
योग्य व सुंतलित आहार घ्यावा, भरपूर पाणी प्यावे.
झाडांना पाणी घालणे, स्वच्छता करणे, आवराआवर करणे, अशी घरातील छोटी कामे करावीत
कॅरम, टेनिस, लंगडी, लिंबू-चमचा, रस्सीखेच हे खेळ खेळावेत
मुलांनी हे टाळावे...
मोबाईलवर सतत व्हिडिओ, गेम पाहणे टाळावे. शक्य तेवढे मोबाईलपासून दूर राहावे
जंक फूड्स, बाहेरील पदार्थ खाणे टाळावे. गोड पदार्थ अति प्रमाणात खाऊ नयेत
सतत घरी बसून राहणे, जेवल्यानंतर लगेच झोप घेणे या गोष्टी टाळाव्यात
कोट
आपल्याकडे ग्रामीण भागात चिल्ड्रन ओबेसिटीचे प्रमाण ५ टक्के, तर शहरी भागात ते सुमारे १० टक्के इतके असते. आता ते दुप्पट झाले आहे. लॉकडाऊनचा मोठा परिणाम मुलांच्या शरीरावर होत आहे. पालकांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी. योग्य, संतुलित आहार आणि मुलांच्या शारीरिक हालचाली सतत होत राहाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न करावेत.
- डॉ. प्रकाश अमणापुरे, बालरोगतज्ज्ञ, मिरज
कोट
ऑनलाईन शाळा, बाहेर जाण्यावर बंधने यामुळे गेले वर्षभर मुले घरीच बसून आहेत. आहारातही बदल होत आहे. जंक फूड्स, बेकरी पदार्थ, गोड खाणे वाढले आहे. शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे मुलांमधील स्थूलता गतीने वाढत आहे. त्यामुळे योग्य आहार, व्यायाम, खेळ महत्त्वाचे आहेत.
- डॉ. अमित खोत, बालरोगतज्ज्ञ, सांगली