मिरज कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:28 AM2021-04-16T04:28:11+5:302021-04-16T04:28:11+5:30
मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज सिव्हिल कोविड ...
मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज सिव्हिल कोविड रुग्णालयातील वाढीव बेडसह सुविधांची गुरुवारी पाहणी केली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी अडीच हजार बेडची व्यवस्था असून कोरोना रुग्णांना बेड कमी पडणार नसल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केला.
गेल्या एक वर्षभरात संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना उपचार देणाऱ्या मिरज शासकीय कोविड रुग्णालयात बेडची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने येथे जादा ६० बेडची व्यवस्था केली आहे. सध्या मिरज कोविड रुग्णालयात एकूण ३२५ बेडसंख्या आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी वाढीव ६० बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.
या वाढीव बेडची व वैद्यकीय व्यवस्थेची जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी मिरज सिव्हीलला भेट देऊन पाहणी केली. सध्या मिरज कोविड रुग्णालयात २४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाढीव बेडसाठी लागणारी कर्मचाऱ्यांची संख्याही जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली आहे. कोविड रुग्णालयात बेड वाढल्याने गरीब व सर्व सामान्य रुग्णांना मोफत उपचार मिळणार आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलात १५० बेडचे कोविड सेंटर सुरू होणार असून महापालिकेचे स्वतंत्र रुग्णालय सुरू झाले आहे. मिरजेतील वाॅन्लेस रुग्णालयातही जादा ५० बेडची मंजुरी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८० टक्के रुग्ण विलगीकरणात असून उपचाराची गरज असलेल्या रुग्णांसाठी अडीच हजार बेडची व्यवस्था असून कोरोना रुग्णांना बेड कमी पडणार नसल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. संशयितांची संख्या वाढल्याने मिरज कोविड प्रयोगशाळेवर पुन्हा ताण पडत आहे. एकाच दिवशी दोन हजार नमुने तपासणीसाठी येत असल्याने अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. यासाठी आणखी खासगी कोविड प्रयोगशाळा सुरू होण्याची आवश्यकता असल्याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सांगितले.