सांगली : विद्यापीठ आणि शिक्षण संस्थांमधील पेेपर फूट प्रकरण आणि परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्याच्यादृष्टीने ऑनलाइन परीक्षा चांगला पर्याय असल्याचे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. यावर्षी सांगली जिल्ह्यातील अभियांत्रिकी, एमसीए, एमबीएच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या आहेत. काही महाविद्यालये, माध्यमिक शाळांनीही विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन परीक्षेची गोडी निर्माण केल्याचेही दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रात कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा नवा पर्याय पुढे येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराबाबत काही वर्षांपूर्वी शासनाने उच्चस्तरीय समिती नेमून अहवाल मागविले होते. या समितीनेही अनेक उपायांसोबत परीक्षा ऑनलाइनपद्धतीने घेण्याच्या उपायांवर अधिक भर दिला. परंतु ऑनलाइन परीक्षा एकदम सर्वांना लागू करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने अशी पद्धत लागू करण्याची गरज आहे. सुरुवातीला खास करून अभियांत्रिकी, एमबीए आणि एमसीए असलेल्या महाविद्यालयांमध्ये ऑनलािन परीक्षाविषयक कामे प्रथम सुरू करावी, असेही समितीने सुचविले होते. कोरोना व्हायरसची भीती आणि लॉकडाऊनमुळे ऑनलाइन परीक्षांचे महत्त्व वाढले आहे. जास्तीत जास्त परीक्षा ऑनलाइनच घेण्याच्या दृष्टीने सरकार आता नियोजन करीत आहे.
फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आग्रहामुळे ऑनलाइन परीक्षांचे महत्त्व सर्वांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता ऑनलाइन परीक्षा द्यावीच लागेल, या हिशोबानेच अभ्यास आणि परीक्षेची तयारी करायला हवी. परीक्षा ऑनलाइन असल्यामुळे परीक्षा केंद्रावर किंवा संबंधित शहरात जाऊन विशिष्ट शाळेत जायची गरज नाही. प्रवास करायची आवश्यकता नाही. प्रत्येकाला त्याच्या शहरातच परीक्षा देता येईल.
चौकट
ऑनलाइन परीक्षेतील त्रुटी
-परीक्षेची एकच वेबसाइट अनेक जिल्ह्यांसाठी कार्यरत असते. एरव्ही अतिशय सुरळीतपणे सेवा देणारी वेबसाइट परीक्षेच्या वेळी नेमकी अचानक हँग होते.
-परीक्षेची वेबसाइट परीक्षा सुरू असताना अनेक वेळा खूप हळूहळू प्रतिसाद देते.
-परीक्षा देताना अचानक लाइट गेल्यास किंवा इंटरनेटची लिंक न मिळाल्यास विद्यार्थ्याची धांदल उडू शकते.
-अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही, संगणक हाताळण्याचे ज्ञान नाही, अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यात अडचणी.
चौकट
ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी?
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षेचा अजिबात बाऊ करून घेऊ नये, कारण एमएससीआयटीची ऑनलाइन परीक्षा अनेक विद्यार्थ्यांनी या अगोदर दिलेली आहे, तशीच परीक्षा फक्त थोड्या फरकाने विद्यापीठाची आणि बोर्डाची आहे. ऑनलाइन परीक्षा देण्याची वेगवेगळ्या संस्थांमध्ये पद्धत वेगळी असते, अशी परीक्षा कशी द्यावी याबाबत माहितीपत्रक संबधित वेबसाइट किंवा संस्थेकडून प्राप्त करून घ्यावे.
चौकट
डेमो परीक्षेची व्यवस्था करावी
ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी, काय तयारी करावी, ऐनवेळी समस्या आली तर कोणते उपाय करावे? यासंबंधी सर्व माहिती परीक्षा मंडळाने वेबसाइटवर प्रकाशित करावी. डेमो परीक्षेचेही व्यवस्था करावी. शक्य झाल्यास ऑनलाइन परीक्षा कशी द्यावी, यासंबंधी शॉर्ट टर्म कोर्स उपलब्ध करावा.