भविष्यात भारताचे युध्द चीन-पाकशी एकाचवेळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:14 AM2017-12-04T00:14:49+5:302017-12-04T00:14:49+5:30

India's war in the future is simultaneously with China and Pakistan | भविष्यात भारताचे युध्द चीन-पाकशी एकाचवेळी

भविष्यात भारताचे युध्द चीन-पाकशी एकाचवेळी

googlenewsNext


सांगली : जागतिक पातळीवरील घडामोडी लक्षात घेतल्यास, भविष्यातील भारताचे युध्द चीनशीच असेल आणि त्यावेळी पाकिस्तानशीही लढावे लागेल, असे प्रतिपादन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले.
सांगली शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाब्रिगेडियर हेमंत महाजन च्या निमित्ताने शनिवारी आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. ‘चीन पुरस्कृत दहशतवाद’ असा व्याख्यानाचा विषय होता. येथील मालू हायस्कूलच्या क्रीडांगणावर केशवराव दीक्षित गौरव व्याख्यानमाला सुरू आहे. सांगली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितीन खाडिलकर यावेळी उपस्थित होते.
महाजन हणाले की, डोकलामच्या निमित्ताने चीन आणि भारतामध्ये मोठा तणाव निर्माण झाला. चीनबद्दल भीतीचे वातावरणही पसरले; मात्र ते एक मानसिक युध्द होते. ते आपण जिंकले आहे. आपल्याला यापुढेही अशा युध्दांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला अंतर्गत सुरक्षेकडे विशेषत: दहशतवाद व नक्षलवादाकडे गांभीर्याने पाहायला हवे. चीनची युध्दखोरीची प्रवृत्ती कायम आहे. त्यांना भारताला हरवून, जगात आपणच दादा आहोत, हे सिध्द करायचे आहे; मात्र गेल्या नऊ वर्षांत भारताने केलेली तयारी मोठी आहे. बंदरांचा विकास जलदगतीने होत आहे. त्याचवेळी चीनचे शेजारी राष्ट्रांशी असलेले संबंध पाहता, तसेच आपल्याशी त्यांची सुरु असलेली मैत्री पाहता, चीनला भारताविरुध्द युध्द पुकारणे तेवढे सोपे नाही. २०२० मध्ये चीन ते युध्द करेल, असेही जाणकारांचे मत आहे. त्यावेळी पाकिस्तानही आपल्याशी युध्द करेल. त्याची तयारी म्हणून ते पाकिस्तानशी जोडणारा चार हजार किलोमीटरचा महामार्ग बनवत आहेत. मात्र हा रस्ता त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही. श्रीलंकेतील त्यांचे बंदर ज्याप्रमाणे आज बंद पडल्यात जमा आहे, तशीच या महामार्गाची अवस्था होईल. आपणही या महामार्गाचा भविष्यात युध्दासाठी वापर करु शकतो. त्याचवेळी पाकिस्तानमधून चीनशी व्यापार झालाच, तर तो दहशतवादाचा होईल. त्यामुळे त्या मार्गाची फारशी भीती बाळगण्याचे कारण नाही. आपल्याला चीनविरुध्द लढायचे आहेच, मात्र त्याचवेळी त्यासाठी जगातील त्यांच्या शत्रुराष्टÑांसोबत आपल्याला मैत्री करावी लागेल, असेही ते म्हणाले.
महान कार्याचा ध्यास हवा
सध्याचे सरकार त्यादिशेने पाऊल टाकत आहे. नुकतेच झालेले आॅस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान या राष्ट्रांबरोबरचे आपले करार त्या रणनीतीचा भाग आहेत. असे मैत्रीसंबंध वाढवून आपण चीनवर दबाव निर्माण करू शकतो. ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आता बदलत आहे. या बदलांचा कानोसा घेऊन आपली धोरणे ठरली पाहिजेत. देश महान होण्यासाठी देशातील नागरिकांनी महान कार्याचा ध्यास घेतला पाहिजे, असेही महाजन म्हणाले.

Web Title: India's war in the future is simultaneously with China and Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.