वांगी : वारकरी संपद्रायाची परंपरा लाभलेल्या येवलेवाडी (ता. कडेगांव) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या महालक्ष्मी मंदिरात देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम पुसेगांव मठाचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर जीर्ण झाल्यामुळे या मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले. यासाठी मंदिर जीर्णोद्धार समिती व सरपंच अविनाश येवले यांनी लोकवर्गणीतून मंदिराचा गाभारा, देवीची मूर्ती व ४१ फूट उंच कळसाचे काम पूर्ण केले. या कामासाठी अंदाजे ३० लाख रुपये खर्च झाला. देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण कार्यक्रम पुसेगांव मठाचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्याहस्ते करण्यात आला. गावातील सर्व माहेवासिनींना साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
मूर्तीची नगरप्रदक्षिणा, शोभायात्रा, भजन, कीर्तन व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम राबवण्यात आले. या कामासाठी अहोरात्र कष्ट घेतलेल्या मंदिर जीर्णोद्धार समिती, देणगीदार व ग्रामस्थ यांचे सरपंच अविनाश येवले यांनी आभार मानले.
फाेटाे : ११ वांगी १
ओळ : वांगी येवलेवाडी येथे महालक्ष्मी मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण साेहळा उत्साहात पार पडला.