मिरज कोविड रुग्णालयात अतिदक्षता व व्हेटिंलेटरचे बेड शिल्लक नाहीत. कोरोना वॉर्डमध्ये १९१ बेड भरले असून, फक्त ३९ शिल्लक आहेत. त्यामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत आहे. तेथेही स्थिती फारशी दिलासादायक नाही. महापालिका क्षेत्रातील १४ खासगी कोविड रुग्णालयात अतिदक्षताचे फक्त ८६ बेड शिल्लक आहेत. ग्रामीण भागात ३५ कोविड रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात १४३ बेड उपलब्ध आहेत. १७२ बेड फुल्ल झाले आहेत. यामध्ये ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांचाही समावेश आहे.
जिल्हाभरात एकूण २ हजार ५७६ बेडपैकी १ हजार ३५९ बेड शिल्लक आहेत. तासगाव ग्रामीण रुग्णालयात सर्व म्हणजे ३० कोविड बेड भरले आहेत. जत ग्रामीण रुग्णालयात चार, तर विटा ग्रामीण रुग्णालयात सात बेड शिल्लक आहेत. आटपाडीत नऊ, तर कडेगावमध्ये १७ शिल्लक आहेत. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभाग फुल्ल झाला असून, कोविड वॉर्डमध्ये फक्त चार बेड रिकामे आहेत.
चौकट
बेडच्या उपलब्धतेसाठी संपर्क करा
जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांतील बेड्सच्या माहितीसाठी बेड इन्फॉर्मेशन ॲपद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. http://smkc.gov.in/Covid19mgt/CovidBedInfo.aspx या लिंकवर माहिती मिळेल. त्याशिवाय ०२३३- २३७४९००, २३७५९०० या क्रमांकावरही संपर्क साधता येईल.