लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कृष्णा नदीवरील आयर्विन पूल तब्बल दोन महिन्यानंतर चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या पुलावरील फूटपाथच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले होते. त्यासाठी या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला ९१ वर्षे पूर्ण झाली आहेत. मध्यंतरी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिटही करण्यात आले. यात पुलाची स्थिती भक्कम असल्याचे सांगण्यात आले. या पुलावरील अवजड वाहतूक दोन ते तीन वर्षांपासून बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी व लहान वाहनांनाच पुलावरून प्रवेश दिला जात होता. त्यातच या पुलाच्या फूटपाथला अनेकदा भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्पुरती मलमपट्टी करून फूटपाथची दुरूस्ती करण्यात आली होती. पुलाला असलेला संभाव्य धोका पाहता, त्याच्या मजबुतीकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत होती. त्यानुसार बांधकाम विभागाने फूटपाथच्या दुरुस्तीसाठी इपोक्सी ट्रीटमेंट व लोखंडी अँगलच्या वेल्डिंगच्या कामाची निविदा काढली होती. पुलाच्या दुरुस्ती कामासाठी २३ फेब्रुवारी ते २४ मार्चपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. पण महिन्याभरात काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यात पुलावरून दुचाकी व पादचाऱ्यांना मुभा देण्यासाठी मध्यंतरी आंदोलन झाले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली, पण लहान वाहनांना मात्र बंदी कायम होती.
या पुलावरील वाहतूक सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्याकडे वळविण्यात आली होती. त्यामुळे या रस्त्यावरही वाहतुकीची कोंडी होत होती. अखेर दोन महिन्यानंतर आयर्विनवरील वाहतूक सुरु झाली आहे. सोमवारी नगरसेवक अजिंक्य पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी पुलावरील पत्रे, बॅरिकेट्स हटविण्यास मदत केली. पुलावर किरकोळ स्लॅबचे काम अद्याप बाकी आहे. पण त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा येत नसल्याने हा पूल वाहतुकीसाठी खुला केल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. डी. मुजावर यांनी सांगितले.