शिराळा
:
शिराळ्यात तयार होणाऱ्या कोरोनावरील इंजेक्शनला मानवीय चाचणीसाठी नजीकच्या काळात परवानगी मिळणार आहे. 'ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया' आणि 'आयसीएमआर'ची मान्यता मिळून लवकरच येथील आयसेरा बायोलॉजिकल कंपनीत अँटिकोविड सिरम इंजेक्शनच्या उत्पादनास सुरुवात होईल, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी येथे दिली.
येथील औद्योगिक वसाहतीतील आयसेरा कंपनीस त्यांनी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, अभिजित पाटील प्रमुख उपस्थित होते.
खासदार माने म्हणाले की, लस तयार करायला मंजुरी मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्रालय, टास्क फोर्स आणि सिरम कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. आयसेरा कंपनीने या औषधाच्या मानवी चाचणीस परवानगी मागितली असली तरी या कंपनीची ‘नॉलेज पार्टनर’ पुण्याची सिरम कंपनी आहे. सिरमच्या सहभागाशिवाय आयसेराच्या मागणीची दखल घेतली जाणार नव्हती. अशा औषधांच्या निर्मितीसाठी देशभरात शंभरावर कंपन्यांनी मागणी केलेली आहे. आयसेरामधील उत्पादन, वरिष्ठ पातळीवरील चर्चा आणि प्रयत्न त्यामुळे उत्पादनास नजीकच्या काळात मानवीय चाचणीसाठी परवानगी मिळेल.
यावेळी प्रतापराव देशमुख, दिलीप कुलकर्णी, नंदकुमार कदम, धैर्यशील यादव आदी उपस्थित होते.
चौकट
सिरमचे फायदे
कोरोना रुग्ण कमीत कमी दिवसांत बरे होऊन घरी परतण्यासाठी हे इंजेक्शन सलाईनमधून द्यावयाचे आहे. त्यामुळे केवळ अत्यंत अत्यवस्थ असलेल्या रुग्णांनाच ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज भासेल. याच्या वापरामुळे मृत्यूदर कमी होईल, असा विश्वास आयसेराद्वारे व्यक्त होत आहे.