जब्बार पटेल यांना भावे गौरव पदक जाहीर
By admin | Published: October 12, 2014 11:19 PM2014-10-12T23:19:35+5:302014-10-12T23:34:06+5:30
पाच नोव्हेंबरला वितरण : स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, ११ हजार रोख
सांगली : येथील अखिल महाराष्ट्र नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने देण्यात येणारे ‘विष्णुदास भावे गौरव पदक’ यंदा ज्येष्ठ निर्माते व दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी आज, रविवारी पत्रकार बैठकीत दिली. पाच नोव्हेंबरला रंगभूमीदिनी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. कराळे म्हणाले की, प्रतिवर्षी रंगभूमीदिनी नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना भावे गौरव पदकाने सन्मानित करण्यात येते. यंदा डॉ. पटेल यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या हस्ते पदक प्रदान होणार आहे. विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व अकरा हजार, असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. पटेल यांनी १९६८ मध्ये हौशी रंगभूमीवरून रंगमंचावर पाऊल टाकले. १९७० मध्ये त्यांनी ‘अशी पाखरे येती’ नाटकात भूमिका आणि दिग्दर्शन करून राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. पुढे प्रा. भालबा केळकर यांच्या पीडीए संस्थेतून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. ‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’, यांसारख्या दर्जेदार नाटकांची निर्मिती व दिग्दर्शन त्यांनी केले.
येथील भावे नाट्य मंदिरात पदक प्रदान समारंभ होणार आहे. त्यानंतर डॉ. दयानंद नाईक व शफी नायकवडी डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. (प्रतिनिधी)
बालगंधर्व, केशवराव दाते यांच्यासारख्या दिग्गजांना मिळालेल्या विष्णुदास भावे पुरस्कार आपल्याला जाहीर झाल्याचे ऐकून आनंद झाला. रंगभूमीवरील सर्वोच्च सन्मान मिळाल्याचा आनंद शब्दांत वर्णन करता येत नाही
- डॉ. जब्बार पटेल