जत तालुक्याच्या शेकडो वर्षांच्या दुष्काळाची मूक साक्षीदार असणारी बोर नदी पावसाळ्यात अवघ्या आठवडाभरातच कोरडी पडते, त्याचमुळे ती कोरडा ठरते. कधी काळी जत परिसर म्हैसूर स्टेटमध्ये समाविष्ट होता. भाषावार प्रांतरचनेनंतर महाराष्ट्रात आला. बोर नदीविषयक दस्तावेज मराठी प्रशासनाकडे आल्यानंतर तिच्या इतिहासाचे संदर्भ लागत गेले.
प्रत्यक्षात एक मोठा ओढा असणारी बोर नदी शासकीय दप्तरात नदी म्हणून नोंद आहे. फक्त परतीच्या पावसातच खळखळते, पण अवघे आठ-दहा दिवसच. नंतर पुन्हा कोरडीठक्क पडते. म्हणून तिचे नाव कोरडा. शिंदीची असंख्य झाडे, मुबलक वाळू ही तिची काही वैशिष्ट्ये. देवनाळ-मेंढेगिरीपासून अमृतवाडीपर्यंत जाते. तेथे सवळ ओढा व शिंदी ओढा नावाने संगम होतो. मुचंडीमध्ये रामलिंग, दर्याप्पा ही काही तिच्या काठावरची देवस्थाने. पुढे संख मध्यम प्रकल्पानंतर कर्नाटकात चडचणकडे धावते.
कधीकाळी तिला महापूरदेखील यायचे. पण आताच्या पिढीला त्याचा अनुभव नाही. २००१ मध्ये झालेल्या धुवाधार पावसाने महापूर येऊन पात्रातील मोठी वाहने वाहून गेली होती. बहुतांशवेळा ती कोरडीच असते. त्यामुळेच ती कोरडा ठरली आहे. अग्रणी नदीप्रमाणे तिचेही पुनरुज्जीवन करण्याची मागणी जतकर करताहेत.