Sangli Election : जयंत पाटलांनी पैसे नाही म्हणणे हास्यास्पद : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 04:00 PM2018-08-04T16:00:31+5:302018-08-04T16:29:01+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
सांगली : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
ते म्हणाले की, सांगली महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेले यश हे आमच्या पारदर्शी व प्रामाणिक धोरणांना मिळालेला कौल आहे. पदरात पराजय पडला म्हणून आता विरोधक काहीही आरोप करतील. भाजपने पैशाचा आणि बळाचा वापर केला, असा आरोप करताना अजून त्यांनी मतदान यंत्रांमधील घोटाळ्याचा आरोप कसा केला नाही, याचे आश्चर्य वाटते.
त्यांनी काही आरोप व टीका ठरविलेल्या आहेत. भाजपवाल्यांकडे पैसे आहेत आणि आमच्याकडे पैसे नसून झोळ्या आहेत, असा आरोप जयंत पाटील यांनी करणे म्हणजे हास्यास्पद प्रकार आहे.
सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अगोदरच आत्मविश्वास गमावला होता. स्वबळावर लढण्याबद्दल त्यांना शंका वाटत होती. म्हणूनच त्यांनी आघाडी केली.
सुरुवातीलाच आत्मविश्वास गमावल्यामुळे त्यांनी महापालिकासुद्धा गमावली. सत्तेत असणाऱ्या कॉँग्रेसबद्दल लोकांमध्ये अविश्वासाचे वातावरण तयार झाले होते. दुसरीकडे आम्ही आ. सुधीर गाडगीळ यांच्यासारखा स्वच्छ चेहरा नेतृत्व म्हणून दिला. त्यामुळे लोकांनी भाजपच्या पारड्यात मते टाकली.
गेल्या काही दिवसांपासून गाडगीळ व आ. सुरेश खाडे यांनी शहरांमध्ये केलेल्या दर्जेदार रस्त्यांमुळेही लोकांचा आमच्यावर विश्वास बसला. मुस्लिमविरोधी, दलितविरोधी म्हणून आमच्यावर शिक्का मारण्याचा प्रयत्न झाला. प्रत्यक्षात आम्ही सर्वाधिक मुस्लिम व दलित उमेदवार दिले आहेत. त्यामुळे सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून आमची ओळख निर्माण झाली आहे.
आयाराम सगळीकडेच!
पाटील म्हणाले की, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयात उमेदवारांना घेऊन भाजपने निवडणूक लढविल्याचा आरोप विरोधकांनी केला. माध्यमांमध्येही त्यापद्धतीची प्रतिक्रिया उमटली, पण कार्पोरेट कंपन्या किंवा कोणत्याही क्षेत्रात चांगल्या माणसांना खेचण्याचा प्रयत्न होत असतो. भाजपने अशाच चांगल्या लोकांना खेचले आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेतले असते तर गोष्ट वेगळी होती.
लोकसभेचा पेढा!
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी नेत्यांनी आणलेल्या पेढ्यांच्या बॉक्समधील एक पेढा उचलून चंद्रकांत पाटील यांनी तो खासदार संजयकाका पाटील यांना भरविला. आगामी लोकसभेसाठी हा पेढा असल्याचे सांगून त्यांनी उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्याचवेळी त्यांनी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेची जबाबदारीही त्यांच्याकडे राहील, असेही सांगितले.