लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मेच्या अवघ्या १६ दिवसात शहरासह तालुक्यातील कोविड रुग्णसंख्येतील वाढ आणि वाढत्या मृत्यूवर काळजी व्यक्त करतानाच संतापलेल्या पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. ज्या रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या जीवाशी खेळले जाते, भरमसाट बिले करून लूट केली जाते, त्या रुग्णालयांबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, असे आदेश त्यांनी दिले.
येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात मंत्री पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेतली. यावेळी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अॅड. चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, उपसभापती नेताजीराव पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रांताधिकारी विजयसिंह देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपजिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नरसिंह देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. प्रशासनाने वस्तुस्थितीची तपासणी करून कडक पावले उचलायला हवीत. कोरोनाग्रस्त लहान मुलांसाठी छोटे कोविड सेंटर सुरू करावे लागेल. प्रशासनाने यासाठी तालुक्यातील लहान मुलांच्या डॉक्टरांची बैठक घेऊन चर्चा करावी. आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास अद्ययावत रुग्णवाहिका देण्यात येईल. या बैठकीत उपस्थित सर्वच अधिकाऱ्यांची जयंत पाटील यांच्या संतापाचा सामना करताना भंबेरी उडाली.
गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तालुक्यातील कोरोना स्थितीचा आढावा मांडला.
आष्ट्याचे माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील यांनी आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयासाठी रुग्णवाहिका व शववाहिकेची मागणी केली. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे यांनी शहरातील काही रुग्णालयातील विदारक परिस्थितीची चौकशी करण्याची मागणी केली.
तालुका आरोग्याधिकारी डॉ. साकेत पाटील, आष्ट्याचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण, डॉ. अशोक शेंडे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, भगवान पाटील, सुभाष सूर्यवंशी, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, खंडेराव जाधव आदी उपस्थित होते.
चौकट
कोणत्या हॉस्पिटलमध्ये मृत्यूची संख्या किती?
उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, शहाजी पाटील यांनी शहरातील कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या किती आहे, त्यावर आपण काय कारवाई केली, असा प्रश्न केला. त्यावर उत्तरे देताना अधिकारी गोंधळून गेले.