जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

By admin | Published: October 8, 2015 11:45 PM2015-10-08T23:45:46+5:302015-10-09T00:47:22+5:30

‘एफआरपी’चा वाद पेटला : शेतकरी संघटनेच्या नेत्यांतच मतभिन्नता

Jayantrava organizes 'flop show' | जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

जयंतरावांपुढे संघटनांचा ‘फ्लॉप शो’

Next

अशोक पाटील -इस्लामपूर -एफआरपीचे तुकडे केल्यास उसाचे दांडके दाखवू, कारखान्याचे खासगीकरण होऊ देणार नाही, एफआरपी एकरकमी देण्यासाठी येणारा हंगाम बंद ठेवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत आणि शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी साखरसम्राटांना दिला आहे. या तिघा नेत्यांनी माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांना ‘टार्गेट’ केले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणतीच कृती होत नसल्याने, शेतकरी संघटनांचा शो ‘फ्लॉप’ ठरत आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी साखरसम्राटांनी एफआरपीप्रमाणे दर दिला आहे. त्याचे श्रेय राजू शेट्टी यांना मिळाले आहे. परंतु राजू शेट्टी यांच्या मतदारसंघात येत असलेल्या व जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मात्र शेट्टी यांची लोकप्रियता कमी करण्यासाठी एफआरपी रक्कम न देण्याचाच विडा उचलला आहे. याविरोधात खासदार शेट्टी, सदाभाऊ खोत यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन याविरोधात आवाज उठविला असला तरी, जयंत पाटील यांनी याची कसलीही दखल घेतल्याचे दिसत नाही. नुकत्याच झालेल्या सभेत पाटील यांनी कारखाना कसा तोट्यात आहे, आम्ही एफआरपी का देऊ शकत नाही, याचा पाढाच गिरवला. त्यामुळे सभासदांनीही त्यांच्या भूमिकेला विरोध केला नाही. शेवटी एफआरपी रकमेचा मुद्दा बाजूलाच राहिला. या सभेत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील व्यासपीठावर बसले होते. त्यांनी तर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एफआरपी रक्कम एकरकमी मिळेपर्यंत पुढील हंगाम सुरु करणार नसल्याचे स्पष्ट केले. जयंत पाटील यांनी शक्कल लढवत एफआरपीमधून प्रकल्प निधी ठेवीच्या नावाखाली कपात केली आहे. परिणामी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा शो ‘फ्लॉप’ ठरत चालला आहे.


‘विश्वास’ची वाटचाल खासगीकरणाकडे
नुकत्याच झालेल्या विश्वास साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत अध्यक्ष, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे सहकारी साखर कारखाने खासगी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. तसा ठरावही त्यांनी केला आहे. या ठरावाला त्यांच्या घरातूनच मोठा विरोध असल्याचे दिसत आहे. मानसिंगराव नाईक हे जयंत पाटील यांचे नेतृत्व मानतात. यापूर्वीही पाटील यांचे स्रेही असलेल्या कडेगाव तालुक्यातील पृथ्वीराज देशमुख यांचा डोंगराई, शिराळा तालुक्यातील शिवाजीराव देशमुख यांचा निनाई कारखाना खासगी झाला आहे. आता विश्वास कारखाना खासगीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यामागे जयंत पाटील सूत्रधार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत.

Web Title: Jayantrava organizes 'flop show'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.