‘कडकनाथ’प्रकरणी सहाशेवर तक्रारी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:46 PM2019-09-02T23:46:16+5:302019-09-02T23:46:19+5:30
सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. ...
सांगली/इस्लामपूर : कडकनाथ कोंबडीपालन फसवणूक प्रकरणाचा गतीने तपास सुरू आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी देण्यात आले आहे. रयत अॅग्रो इंडिया आणि महारयत अॅग्रो इंडिया या कंपन्यांकडून महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थानपासून छत्तीसगडपर्यंतच्या शेतकऱ्यांची यात फसवणूक झाली असून, आतापर्यंत सहाशेवर तक्रार अर्ज आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) या दुसºया संचालकाला येथील न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. कंपनीचा संचालक संदीप सुभाष मोहिते याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
शर्मा म्हणाले की, कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तक्रारदारांची संख्याही वाढत आहे. रयत अॅग्रो कंपनीचे कार्यालय बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर या कोंबड्यांचे करायचे काय, कोंबडी खाद्याचे काय करायचे, असे प्रश्न आहेत. ग्राहक मिळविण्यातही अडचण आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग सखोल चौकशी करणार आहे. आतापर्यंत या प्रकरणात दोघांना अटक केली आहे. सोमवारी कर्नाटकातील बिदर येथील एक कुटुंब चार लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे आले होते.
अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख मनीषा डुबले यांनी इस्लामपूर येथे भेट देऊन माहिती घेतली. अटकेत असलेल्या संदीप मोहिते याच्याकडे कसून चौकशी केली. त्याचबरोबर अधिकाºयांना तपासकामी सूचनाही केल्या. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने प्रत्येक शक्यता काटेकोरपणे पडताळून संशयितांविरुध्द भक्कम पुरावे संकलित करावेत, असे निर्देश दिले. पोलीस उपअधीक्षक कृष्णत पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी डुबले यांना माहिती दिली.
राज्य आणि परराज्यातील आठ ते दहा हजार शेतकºयांची ५०० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करणाºया कडकनाथ कुक्कुटपालन व्यवसायातील कंपनीच्या पाच संचालकांविरुध्द शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. पोलिसांनी इस्लामपूर आणि पुणे येथील कार्यालये सील केली आहेत. पुण्याच्या कार्यालयातील प्रत्येक कागदपत्राची तपासणी करून ती ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे.
मोठ्या गुंतवणूकदारांच्या अद्याप तक्रारी नाहीत
आतापर्यंत एक लाखापासून अडीच लाखापर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदारच तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. मात्र, पाच लाखांपासून ३० लाखांपर्यंत फसवणूक झालेले गुंतवणूकदार अद्याप पोलिसांकडे आलेले नाहीत. अशा मोठ्या गुंतवणूकदारांची संख्या मोठी आहे. त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे आल्यावर या घोटाळ्यातील आकडा वाढण्याची शक्यता आहे.