कामटेला पोलीस ठाण्यात हजर होण्याबाबत बजावले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:42 AM2021-02-23T04:42:36+5:302021-02-23T04:42:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेले अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पोलीस ठाण्यातून पळून गेल्यानंतर तत्कालीन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेले अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पोलीस ठाण्यातून पळून गेल्यानंतर तत्कालीन उपनिरीक्षक युवराज कामटेला दूरध्वनीवरून ‘थापा मारू नकोस, आरोपी पळून कसे जातात’, म्हणत ताबडतोब पोलीस ठाण्यात हजर होण्याबाबत बजावले होते, अशी महत्त्वपूर्ण साक्ष तत्कालीन पोलीस उपधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी सोमवारी न्यायालयासमोर दिली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित होते. बचाव पक्षातर्फे ॲड. किरण शिरगुप्पे आणि ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी उलटतपास घेतला.
घटनेच्या दिवशीचा संपूर्ण क्रम काळे यांनी न्यायालयासमोर मांडला. त्या म्हणाल्या की, चोरीच्या गुन्ह्याखाली कोथळे व भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती. रात्री साडेसातच्या सुमारास मी शहर पोलीस ठाण्यास भेट दिली. नंतर रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी शहर पोलीस ठाण्यास भेट दिली. त्यावेळी कोथळे आणि भंडारे कोठडीत नसल्याचे दिसले. कामटेही तिथे नसल्याने त्यास दूरध्वनी केला असता, दोघे पळून गेल्याचे त्याने सांगितले. यावर त्याला खडसावत थापा मारू नकोस, ताबडतोब ठाण्यात ये, असे सांगितले होते.
शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनाही बोलावून घेत चाैकशी केली तर त्यांनीही माहिती नसल्याचे सांगितले. याचवेळी कामटे आला. त्याने आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले. ही माहिती वरिष्ठांना का कळविली नाही, याबाबत त्याला विचारले तर त्याने निलंबित होण्याच्या भीतीने गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याचेही काळे यांनी सांगितले.
त्या रात्री कामटेने गुन्हा दाखल केला तरी त्यावर स्वाक्षरी केली नव्हती, असे उपनिरीक्षक चव्हाण यांनी सांगितले होते. त्यानंतर एक आरोेपी निपाणीजवळ मिळाल्याचे सांगत कामटेने दुसऱ्या दिवशी येऊन त्यावर सही केली होती, असे काळे यांनी सांगितले.
चौकट
दोन दिवस सुनावणी
पोलीस कोठडीतील मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी बुधवारपर्यंत चालणार आहे. पोलीस उपअधीक्षक काळे यांची साक्ष झाल्यानंतर बचाव पक्षातर्फेही उलट तपासणी झाली.