सांगली : कवठेपिरान (ता. मिरज) येथील दादासाहेब शंकर मगदूम यांच्या घरातील तिजोरीतून चोरट्यांनी १७ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. त्यांची किंमत तीन लाख १५ हजार रुपये आहे. तीन महिन्यांपूर्वी चोरीचा हा प्रकार घडला आहे, मात्र, तो ३ आॅक्टोबरला उघडकीस आला. मगदूम यांनी आज, मंगळवारी रात्री सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली.मगदूम शेती करतात. त्यांचे दुमजली घर आहे. दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये तिजोरी आहे. तिजोरीमध्ये दागिने होते. ३ आॅक्टोबरला विजयादशमी होती. त्यादिवशी त्यांनी दागिने घेण्यासाठी तिजोरी उघडली; परंतु तिजोरीत दागिने नसल्याचे महिलांच्या निदर्शनास आले.कपाटाची चावी तिजोरीजवळच असते. ती घेऊन चोरट्यांनी कपाट उघडले असावे. लॉकरमध्ये ठेवलेले मंगळसूत्र, दोन बांगड्या, लाल खड्याची अंगठी, दोन कर्णफुले, झुबे, रिंगा, कानातील साखळी, पाच वेढण असे एकूण १७ तोळ्यांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले असल्याचे मगदूम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या अडीच ते तीन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी घरात प्रवेश करून ही चोरी केली असावी, असेही मगदूम यांनी तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)तपास गुन्हे अन्वेषणकडेचोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मगदूम यांनी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांच्याकडे धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. सावंत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मगदूम यांची तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. त्यानुसार तक्रार घेऊन गुन्हा ग्रामीण पोलिसांत दाखल केला. मात्र, तपास गुन्हे अन्वेषणकडेच सोपविण्यात आला आहे. याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत, असे सांगण्यात आले.
कवठेपिरानमध्ये घरातून १७ तोळे दागिने लंपास
By admin | Published: October 08, 2014 12:22 AM