राहुरी (जि. अहमदनगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा मान सांगली जिल्ह्याला प्रथमच मिळालाय. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील डॉ. प्रशांतकुमार गुलाबराव पाटील यांच्या खांद्यावर या विद्यापीठाची जबाबदारी आली आहे.
सांगलीचा हा सुपुत्र सांगली, कोल्हापूरसह जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर व सातारा कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठात सर्वोच्च स्थानी विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे डॉ. पाटील याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. आतापर्यंत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मुंबई येथील केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे संचालक म्हणून काम करत होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकीची बीटेक पदवी प्राप्त केल्यानंतर खरगपूर आयआयटी येथून एमटेक पूर्ण केले. त्यानंतर नागपूर येथील व्हीएनआयटी येथून पीएच.डी. मिळविली. उच्च शिक्षणाच्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतर कुलगुरू पदासारखी सर्वोच्च जबाबदारी मिळणे, हा मोठाच सन्मान ठरला आहे. पाच वर्षांसाठी ते या पदावर राहतील.
डॉ. पाटील यांची शैक्षणिक व नोकरीची कारकीर्द मुंबईमध्ये असली, तरी कवठेएकंद गावाशी नाळ सुटू दिलेली नाही. वर्षातून काहीवेळा गावाकडे त्यांची फेरी हमखास ठरलेली असते. गावाकडचे नातेवाईक आणि मित्रमंडळींशी नित्य संपर्क असतो. त्यांच्या निवडीने कवठेएकंद गावात दसऱ्याच्या आतषबाजीचे वातावरण होते.