कवठेमहांकाळ नगरपंचायतीत भुयारी गटारीच्या कामावरून खडाजंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:18 AM2021-07-03T04:18:16+5:302021-07-03T04:18:16+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात भुयारी गटारीच्या कामात काही नगरसेवकांनी ठेकेदार व नगरपंचायतीमधील एका अभियंत्यास हाताशी धरून भ्रष्टाचार ...
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील विद्यानगर परिसरात भुयारी गटारीच्या कामात काही नगरसेवकांनी ठेकेदार व नगरपंचायतीमधील एका अभियंत्यास हाताशी धरून भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपचे नेते हायुम सावनुरकर, नगरसेविका सिंधुताई गावडे, विशाल वाघमारे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आक्रमक होत काम बंद पाडले. याप्रश्नी नगरपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत जाेरदार खडाजंगी झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हाणामारीचा प्रसंग टळला.
कवठेमहांकाळ शहरातील पोतदार मळा ते जुना स्टॅन्ड ओढापात्र असे एक कोटी १४ लाख रुपये खर्चाचे भुयारी गटारीचे काम मंजूर आहे. हे काम काही नगरसेवकांनी नगरपंचायतीमधील एक अभियंता व कोल्हापूर येथील ठेकेदाराशी संगनमत करून टक्केवारी ठरवून दिले व त्याची सुरुवातही केली, असा नगरसेविका व माजी उपनगराध्यक्षा सिंधुताई गावडे, विरोधी पक्षनेते विशाल वाघमारे यांचा आराेप आहे. भाजपचे नेते हायुम सावनुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मारुती पवार, महादेव सूर्यवंशी, महावीर माने, रणजित घाडगे, संजय कोळी यांच्यासह नागरिकांनी शुक्रवारी या कामाच्या ठिकाणी जाऊन कामाची पोलखोल केली.
त्यानंतर शेकडो नागरिक नगरपंचायतीत आले. नगराध्यक्ष पंडित दळवी, उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला, नगरसेवक सुनील माळी, चंद्रशेखर सगरे, पांडुरंग पाटील, बाळासाहेब पाटील, मुख्याधिकारी डॉ. संतोष मोरे यांच्या उपस्थितीत बैठक सुरू झाली. चर्चेला सुरुवात हाेताच खडाजंगी उडाली. अधिकारी आणि आंदोलनकर्ते यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या.
वादाची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्याचे सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी करे, राहुल कोलंबीकर, पोलीस प्रशांत जाधव यांच्यासह पोलिसांनी हस्तक्षेप करीत दाेन्ही गटांना बाजूला केले. पाेलिसांच्या हस्तक्षेपामुळे हाणामारीचा प्रकार टळला.
अखेर भाजपचे नेते हायुम सावनुरकर यांनी खासदार संजयकाका पाटील, आमदार सुमनताई पाटील यांच्यासह नागरिकांची बैठक घेऊनच निर्णय घेऊ. असे सुचवले व या वादावर पडदा पडला.
चौकट
या परिसरातील नागरिकांनी या भुयारी गटारासाठी १ फुटाऐवजी ३ फुटाची पाईप वापरावी, अशी मागणी केली आहे. परंतु तांत्रिक अडचण सांगत ठेकेदार एक फुटाची पाईप वापरत असल्याने हा वाद उफाळला असल्याचे माजी उपनगराध्यक्ष सिंधुताई गावडे यांनी सांगितले. मुळात या कामाच्या सर्वेक्षणातच चुका असल्याचे त्या म्हणाल्या.