सचिन लाड ल्ल सांगली राज्य शासनाच्या गृह विभागाने साप्ताहिक सुट्टीदिवशी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यादिवशी ‘दुप्पट’ पगार देण्याच्या केलेल्या घोषणेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु झाली आहे. ‘दुप्पट’ पगारामुळे शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयांचा फटका बसणार असल्याने, कोणत्याही स्थितीत पोलिसांच्या साप्ताहिक सुट्टीला हात लावू नये, असा आदेश गृह विभागाने दिला आहे. त्यामुळे अगदी सण, उत्सव असला तरी, त्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या जात नाहीत. शासनाच्या या निर्णयाचा पोलिसांच्यादृष्टीने चांगला फायदा झाला आहे. कुठे काहीही अनुचित प्रकार घडो, पोलीस नजरेला पडतोच. कधी आपल्याला वेळाने घरी जायचा प्रसंग आला, तर रस्त्यावर हातात काठी घेऊन गस्त घालताना फक्त पोलीसच दिसतो. तरीही जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी आहे. दोन-सहा महिन्यातून पोलीस सेवेतून निवृत्त होतातच. पण त्यांची जागा भरण्याची तातडीने कार्यवाही केली जात नाही. वर्षात एकदाच भरती होत असली तरी, त्या तुलनेत कर्मचारी सेवानिवृत्तही होत आहेत. रिक्त असलेल्या ८५ जागांमध्ये पोलीस शिपाई, नाईक, हवालदार व सहायक पोलीस फौजदारांचा समावेश आहे. देश किंवा राज्यपातळीवर काही अनुचित घटना घडल्यास, जिल्ह्यातील पोलिसांच्या सुट्ट्या व रजा रद्द केल्या जात होत्या. जे पोलीस सुट्टीवर, रजेवर आहेत, त्यांना तातडीने ड्युटीवर बोलावून घेतले जात होते. याशिवाय दैनंदिन कामाचाही त्यांच्यावर प्रचंड ताण असे. गेल्या अनेक वर्षापासून केवळ पोलिसांच्या बाबतीतच अशी स्थिती आहे. त्यामुळे पोलिसांना कौटुंबिक सुख, नातेवाईकांच्या भेटी, तसेच सण, उत्सवाला मुकावे लागले आहे. सततच्या ड्युटीमुळे त्यांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. अनेक पोलिसांचा ड्युटीवर असताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. गृह विभागाने दोन महिन्यापूर्वी, सुट्टीदिवशी जे पोलीस काम करतील, त्यांना ‘दुप्पट’ पगार देण्याचा लेखी आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी होईल की नाही, याची खुद्द पोलिसांनाही विश्वासार्हता नव्हती. पण आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात आहे. सुट्टीदिवशी पोलीस कामावर हजर राहिले, तर त्याचा आर्थिक भुर्दंड शासनालाच बसणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत सुट्टीदिवशी पोलिसांना कामावर बोलावू नये, असे आदेश आहेत. गेल्या दोन महिन्यात झालेल्या गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात पोलिसांच्या सुट्ट्या, रजा बंद केल्या नव्हत्या. अडीच हजारावर पोलिसांना लाभ जिल्ह्याला २ हजार ७५२ पोलीस कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. पण प्रत्यक्षात २ हजार ६६७ पोलीस सध्या सेवेत आहेत. ८५ पदे रिक्त आहेत. सेवेत असलेल्या अडीच हजारहून अधिक पोलिसांना गृह विभागाच्या आदेशाचा लाभ झाला आहे. ‘डबल’ पगाराचे गाजर दाखविले असले तरी, त्याबद्दल पोलिसांना फारसा आनंद झाला नव्हता. कारण विश्रांतीसाठी आठवड्याची एक सुट्टी महत्त्वाची असते, असे अनेक पोलिसांनी बोलून दाखविले.
‘खाकी’ची ‘सुट्टी’वरील गदा टळली!
By admin | Published: October 30, 2015 11:46 PM