लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) येथे रणरणत्या उन्हात पोलिसांचा बंदोबस्त सुरू आहे. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईमुळे शुकशुकाट आहे. अशावेळी एकजण न घाबरता पोलीस गाडीजवळ येत भुकेल्या पोटाला दोन घास देण्यासाठी हात जोडतो. क्षणाचाही विलंब न लावता पोलीस घरून आणलेला जेवणाचा डबा त्याला देतात... शुक्रवारी, अक्षय तृतीयेच्या सणावेळी खाकी वर्दीतील माणुसकीचे हे दर्शन घडले.
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. कोकरुडला चौकात बंदोबस्तावरील पोलिसांची गाडी उभी होती. अशावेळी विस्कटलेले केस, फाटलेले कपडे अशा अवस्थेतील फिरस्ता थेट जवळ आला. त्याच्या केविलवाण्या चेहऱ्यावर भूक स्पष्ट जाणवत होती. अर्ध्याकच्च्या मराठी-हिंदीत तो बोलला, ‘साहब, भूक लागलीय, खाना मिलेगा?’ कोकरूडमध्ये बंदोबस्तावर असलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. क्षणाचाही विलंब न करता त्याला शेजारच्या बसस्थानकात सावलीला बसायला सांगून त्यांनी त्याला पाण्याची बाटली दिली. हात स्वच्छ धुवायला लावले. सकाळीच घरातून आलेला स्वतःचा जेवणाचा डबा पोलीस कर्मचारी शिवाजी शेळके यांनी उघडला. सणानिमित्त पोळी, भाजी, शेक, पापड, भात असा बेत होता. तो त्याच्यासमोर बाकड्यावर मांडला गेला. काही क्षण तो त्या जेवणाकडे आणि त्या सगळ्या खाकी वर्दीतील देवदूतांकडे पहातच राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी त्याला पोटभरून खाण्याचा आग्रह केला आणि तो पोटभर जेवला. जेवल्यावर ढेकर दिली...
आयुष्यात काय कमवायचे आणि काय गमवायचे, हे कोरोनाचा कठीण काळ शिकवून गेला...
चाैकट
पोलिसांच्या रूपातील देवदूत
पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, सहाय्यक फौजदार शंकर कदम, चालक शिवाजी शेळके आणि त्यांचे सहकारी शिराळा तहसील कार्यालयातील भुजंग जंगम, अमोल कांबळे यांनी त्या फिरस्त्याची सगळी माहिती घेऊन त्याच्या घरी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.