सांगलीत अध्यक्षपदी कोरबू की कोरे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 07:41 PM2020-01-01T19:41:27+5:302020-01-01T19:42:13+5:30
जिल्हा परिषदेत भाजपच्या चिन्हावरील २४ आणि अपक्ष दोन अशी २६ सदस्यसंख्या आहे. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रयत विकास आघाडीचे जगन्नाथ माळी (पेठ, ता. वाळवा) आणि निजाम मुलाणी (येलूर, ता. वाळवा) भाजपबरोबर जाणार हे निश्चित झाले आहे.
सांगली : जिल्हा परिषदेत भाजप सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. सरिता कोरबू (आरग, ता. मिरज) आणि प्राजक्ता कोरे (म्हैसाळ, ता. मिरज) यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी चुरस असून, उद्या, दि. २ जानेवारी रोजी त्याचा फैसला होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी मात्र मिरज तालुक्यातील कवलापूर गटाचे सदस्य शिवाजी डोंगरे यांचे नाव निश्चित झाले आहे. जत, आटपाडी, पलूस, वाळवा आणि तासगाव या पाच तालुक्यातील चार सदस्यांना सभापतीपद मिळणार आहे.
जिल्हा परिषदेत भाजपच्या चिन्हावरील २४ आणि अपक्ष दोन अशी २६ सदस्यसंख्या आहे. राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे रयत विकास आघाडीचे जगन्नाथ माळी (पेठ, ता. वाळवा) आणि निजाम मुलाणी (येलूर, ता. वाळवा) भाजपबरोबर जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे भाजपकडे २८ सदस्य होत आहेत. यातील बहुसंख्य सदस्यांना सहलीवर पाठवण्यात आले आहे. मात्र खासदार संजयकाका पाटील भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाराज असल्यामुळे त्यांच्या गटाचे चार सदस्य सहलीमध्ये सहभागी झाले नाहीत. हे चार सदस्य अक्कलकोट येथे गेले आहेत. यामुळे २८ सदस्यांमधून चार सदस्य वजा केल्यास, भाजपकडे महाडिक गटासह २४ सदस्य राहणार आहेत. भाजपने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एका सदस्याला खेचले आहे. रयत विकास आघाडीमधील सुरेखा जाधव (कामेरी, ता. वाळवा), महिला व बालकल्याण समिती सभापती डॉ. सुषमा नायकवडी यांनाही भाजपकडे खेचण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
रयत विकास आघाडीचे चार सदस्य भाजपबरोबरच राहणार आहेत, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केला आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे तीन सदस्यही भाजपसोबत राहतील. यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही. खा. पाटील यांचीही नाराजी दूर झाली असून तेही आमच्यासोबतच आहेत, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या हालचाली लक्षात घेतल्यास, त्यांचे स्पष्ट बहुमत दिसत आहे. अध्यक्षपदासाठी दुधोंडीच्या अश्विनी पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाला सलग दोनवेळा अध्यक्षपदाची संधी दिली जात असल्यामुळे भाजपच्या अन्य सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी सरिता कोरबू अथवा प्राजक्ता कोरे यांच्यापैकी एक नाव गुरुवार, दि. २ जानेवारीरोजी सकाळीच निश्चित होणार आहे. अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. या दोन नावांभोवतीच भाजपच्या कोअर कमिटीमध्ये चर्चा चालू आहे. उपाध्यक्षपदासाठी शिवाजी डोंगरे यांचे नाव निश्चित झाले आहे. डोंगरे यांच्या नावाला खा. संजयकाका पाटील यांनीही सहमती दिल्याची भाजप नेत्यांमध्ये चर्चा आहे.
उर्वरित चार विषय समित्यांच्या सभापतिपदासाठी पलूस तालुक्यातून दुधोंडीच्या अश्विनी पाटील, वाळवा तालुक्यातून महाडिक गटाचे जगन्नाथ माळी, निजाम मुलाणी यांच्यापैकी एकास, आटपाडी तालुक्यातून अरुण बालटे, जत तालुक्यातून सरदार पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. पण, ऐनवेळी अन्य नावांचाही विचार होऊ शकतो. तासगाव तालुक्यातून खा. संजयकाका पाटील यांचे चुलते डी. के. पाटील यांचे नावही सभापतिपदासाठी पुढे येऊ शकते.