ऑक्सिजन तुटवड्यामुळे मिरजेतील कोविड रुग्णालये अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:42 AM2021-05-05T04:42:18+5:302021-05-05T04:42:18+5:30
कोविड साथीमुळे गतवर्षी मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यांत आले. याशिवाय अनेक खासगी रुग्णालयात कोविड उपचार ...
कोविड साथीमुळे गतवर्षी मार्चपासून मिरज शासकीय रुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटरमध्ये करण्यांत आले. याशिवाय अनेक खासगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू आहेत. मिरजेत शासकीय व खासगी रुग्णालयात सुमारे आठशे रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने मिरजेत कोविड रुग्णालयांवर मोठा ताण आहे. कोविड रुग्णालयात ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मिरजेत कोविड उपचार करणाऱ्या सात खासगी रुग्णालयांपैकी सेवासदन या एकाच रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा आहे. उर्वरित खासगी व शासकीय कोविड रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा अपुरा असल्याने, गेल्या दोन दिवसांपासून चिंताजनक परिस्थिती आहे. या रुग्णालयातील व्हेंटिलेटर व अतिदक्षता विभागात अखंड ऑक्सिजन पुरवठा आवश्यक आहे. शासकीय कोविड हाॅस्पिटल फुल्ल असून, येथे ऑक्सिजनची गरज असलेले सुमारे चारशे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. मात्र, दैनंदिन गरजेइतका ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णालयांची धावपळ सुरू आहे. ऑक्सिजन टंचाई कायम राहिल्यास हाहाकार निर्माण होण्याची भीती वैद्यकतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. कोल्हापुरातून होणारा ऑक्सिजन पुरवठा अनियमित असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
एप्रिलपासून कोविडच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने सध्या पाचपट ऑक्सिजनची मागणी आहे. मिरजेत दररोज वीस हजार लीटर ऑक्सिजनची मागणी असताना, कसाबसा दहा हजार लीटर ऑक्सिजन मिळत आहे. परिणामी, ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन पुरवठ्याचे नियंत्रण अन्न व औषध विभाग व जिल्हा प्रशासनाकडे असतानाही ऑक्सिजन टंचाई आहे. मिरजेत कोणत्याही रुग्णालयात एक दिवसाचाही राखीव साठा नसल्याने, एक दिवस टँकर न आल्यास रुग्णांचा श्वास बंद होण्याची भीती आहे. जिल्ह्याचे कोविड उपचार केंद्र असल्याने येथे गंभीर रुग्णांची संख्या मोठी असल्याने ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ऑक्सिजन पुरवठा नसल्याने काही खासगी रुग्णालयांनी नवीन रुग्ण दाखल करून घेणे बंद केले आहे.
चाैकट
तत्काळ पुरवठ्याची गरज
जिल्ह्याचे कोविड उपचार केंद्र असलेल्या मिरजेत ऑक्सिजन टंचाईमुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचे जीव धोक्यात असल्याने मिरजेतील रुग्णालयांसाठी तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष बाबासाहेब आळतेकर यांनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.