पलूस : राज्यात एफआरपीपेक्षा जास्त दर देणारा कारखाना म्हणजे क्रांती कारखाना आहे. यावर्षी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा ८० रुपये जादा देत आहोत. यातील ४० रुपये भाग विकास निधी जमा करून उर्वरित ४० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर दीपावलीपूर्वी जमा करीत आहोत असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले.
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. (बापू) लाड सहकारी साखर कारखान्याच्या २६ व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. लाड म्हणाले, कारखान्याची २९७५ रुपये एफआरपी असताना यावर्षी ३०५५ रुपये देत आहोत. अहवाल सालात मध्यम मुदत कर्जाची उचल न करता मागील कर्जाची बहुतांश परतफेड केली आहे. ऊस नोंदीची होणारी दिरंगाई टाळण्यासाठी शेतावरच उसाची नोंदणी घेतली जात आहे. आगामी हंगामासाठी १४ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. यातून १२ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊस तोडणी मिळावी यासाठी कारखान्याची क्षमता साडेसात हजार टन केली आहे.
कारखान्याने अद्ययावत आसवणी प्रकल्प उभारला आहे. शेती आणि शेतकऱ्यावर कितीही संकटे आली तरी क्रांती कारखाना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असेल.
प्रारंभी जी. डी. बापू आणि विजयाकाकू लाड यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. श्रद्धांजलीच्या ठरावाचे वाचन संपतराव सावंत यांनी केले. उपाध्यक्ष उमेश जोशी यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, सचिव अप्पासाहेब कोरे यांनी विषयपत्रिका वाचन केले. दिलीप पार्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक नारायण जगदाळे यांनी आभार मानले.
यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, दिलीप लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, सर्जेराव पवार, बाबासाहेब शिंदे (देवराष्ट्रे), अनिल जाधव (हिंगणगाव), वसंत लाड, उपसभापती अरुण पवार, कारखान्याचे संचालक रामदास सावंत, संदीप पवार, जयप्रकाश साळुंखे, अप्पासाहेब जाधव, सतीश चौगुले, आत्माराम हारुगडे, भगवंत पाटील, पोपट संकपाळ, दिलीप पाटील, अंकुश यादव आदी उपस्थित होते.