‘कृष्णा’चे नेर्ले गटातून उच्चांकी ऊस तोडणीचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:51+5:302021-02-14T04:24:51+5:30
नेर्ले : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता मध्यावर आला आहे. कोरोनामुळे यंदाच्या हंगामात सर्वच कारखान्यांना ऊसतोडणीची समस्या भेडसावत ...
नेर्ले : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम आता मध्यावर आला आहे. कोरोनामुळे यंदाच्या हंगामात सर्वच कारखान्यांना ऊसतोडणीची समस्या भेडसावत आहे; पण अशा अडचणीच्या काळातही कृष्णा कारखाना मात्र नवनवीन विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहे. फक्त एका नेर्ले गटातून तब्बल ९० हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कृष्णा कारखान्याने ठेवले आहे.
नेर्ले गटातून इतक्या मोठ्या प्रमाणात यंदा तोडणी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, गेल्या १० वर्षांतील ही उच्चांकी तोडणी असणार आहे. वाळवा तालुक्यातून यंदा सर्वाधिक म्हणजेच तब्बल ३५ हजार ६५८ हेक्टर ऊस उपलब्ध होता. मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने याची तोडणी करणे हे कारखान्यापुढे आव्हान होते. मात्र, हे आव्हान कृष्णा कारखान्याने पेलले आहे.
कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र हे सातारा व सांगली जिल्ह्यांत असून, वाळवा तालुक्यातील अनेक गावांचा यात समावेश होतो. नेर्ले गटातही नेर्ले, केदारवाडी व काळमवाडी या गावांचा समावेश होतो. कृष्णा कारखान्याला नेर्ले गटातून दरवर्षी सरासरी ८०० हेक्टर उसाची नोंद केली जाते. यावर्षी ८०३ हेक्टरची नोंद कारखान्याकडे झाली आहे. याठिकाणी ऊसतोडींना प्राधान्य देऊन नेर्ले गटातून दररोज ७५० टन ऊस कृष्णा कारखान्याच्या तोडणी यंत्रणेमार्फत तोडला जात आहे. या हंगामात कृष्णा कारखान्याने या गटातून जवळपास ९० हजार टन ऊसतोडणीचे उद्दिष्ट ठेवले असून, आतापर्यंत सुमारे ६२ हजार टन ऊस गाळपास आणला आहे.
चौकट
गेल्या दहा वर्षांतील उच्चांक
नेर्ले गटातून गेल्या १० वर्षांत कृष्णा कारखान्याला ९० हजार टन इतका ऊस कधीही गाळपास गेलेला नाही. २०१०-११ ते २०१४-१५ या गळीत हंगाम काळात नेर्ले गटातून सुमारे ६२ हजार टन ते ७५ हजार टन ऊस गाळपास गेला. गळीत हंगाम २०१५-१६ ते २०१९-२० या काळात सर्वाधिक ८४ हजार ३०९ टन इतका ऊस गाळपास गेला आहे.