थयथय नाचत कृष्णा आली, किडूकमिडूक संसार सोबत घेऊन गेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:22 AM2021-07-25T04:22:41+5:302021-07-25T04:22:41+5:30

फोटो २४ सिद्धव्वा मोरे फोटो २४ सारिका मुत्तुडकर फोटो २४ संतोष ०१ - पुरामुळे घरदार सोडावे लागलेली कुटुंबे महापालिकेच्या ...

Krishna came dancing and took Kidukmiduk with him | थयथय नाचत कृष्णा आली, किडूकमिडूक संसार सोबत घेऊन गेली

थयथय नाचत कृष्णा आली, किडूकमिडूक संसार सोबत घेऊन गेली

Next

फोटो २४ सिद्धव्वा मोरे

फोटो २४ सारिका मुत्तुडकर

फोटो २४ संतोष ०१ - पुरामुळे घरदार सोडावे लागलेली कुटुंबे महापालिकेच्या शाळेत आश्रयाला आली आहेत.

फोटो २४ संतोष ०२ - एकत्र राहणाऱ्या पूरग्रस्तांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शाळेतच त्यांची चाचणी केली जात आहे.

संतोष भिसे

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : ‘दोन वर्सापल्याडच्या पुरात पाच-पन्नास हजारांचं नुकसान झालं. पुरापास्न धडा घेतला. काल पावसानं जोर धरल्याचं बघून लगेच घर सोडलं. सोबत घेता येईल तेवढं घेतलं होतं. आज सकाळपर्यंत किस्नामाईनं सारं घरदार धुवून नेलं होतं.’ जुना बुधगाव रस्त्यावर वाल्मिकी आवास परिसरात राहणाऱ्या सिद्धव्वा मोरे सांगत होत्या.

महापुरामुळे घरदार सोडून मिळेल तेथे आश्रय घेतलेल्या सर्वच कुटुंबांच्या कहाण्या थोड्या-अधिक फरकाने अशाच आहेत. कोणाची जनावरे वाहून गेली, तर कोणाची घरे जमीनदोस्त झालीत. कोणीतरी पोराच्या लग्नासाठी जमवलेला संसार कृष्णेने गिळंकृत केलाय, तर पुराच्या धसक्याने एखाद्याला थेट रुग्णालयातच दाखल करावे लागले आहे. सिद्धार्थनगर, रामनगर, पाटणे प्लॉट, कर्नाळ रस्ता, काकानगर, वाल्मिकी वसाहत, गवळी गल्ली, मगरमच्छ कॉलनी, सांगलीवाडी येथील शेकडो कुटुंबांनी पुरात घर सोडले आहे. महापालिकेच्या निवाऱ्यांचा आधार घेतला आहे. महापालिका क्षेत्रात १८ शाळांमध्ये पूरग्रस्तांच्या राहण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे.

सांगलीत आरटीओ कार्यालयाजवळ शाळा क्रमांक २४ मध्ये १९ कुटुंबांतील ९९ लोक आश्रयाला आहेत. बहुतांश कुटुंबे जुना बुधगाव रस्त्यावर राहणारी आहेत. शुक्रवारी दुपारीच त्यांना महापालिका आणि अन्य स्वयंसेवी संस्थांच्या वाहनांनी शाळेत आणून सोडले. चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था महापालिकेने केली आहे. शाळेची स्वच्छतागृहे पुरेशी नसली तरी नाईलाज आहे. सकाळी नाश्त्यासाठी उपीट आणि पोहे घेतल्यानंतर पुरुष मंडळी बुडालेल्या घरांकडे धावली. उरले-सुरले वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. महिला सामान लावण्यात गुंतल्या होत्या. पुरापासून वाचवण्यासाठी भांडीकुंडी, सिलिंडर, टिव्ही, कपडे, कपाटे, धान्य सारेच गुंडाळून घ्यावे लागले होते. वर्गखोल्यात त्याचे ढिगारे लागले होते. आजारी-पाजारी माणसांनाही वर्गातच झोपावे लागले होते. दुपारी एक वाजता जेवण येताच पंगत बसली. जेवणानंतरचा सारा दिवस पूर ओसरण्याची वाट पाहण्यात गेला.

चौकट

पुराबरोबरच कोरोनाचीही भीती

पूरग्रस्तांना शाळेत एकत्र ठेवताना महापालिकेने प्रत्येकाच्या कोरोना चाचण्या केल्या. त्यासाठी प्रत्येक शाळेत रॅपिड ॲंटिजन कीटसह वैद्यकीय पथक तळ ठोकून होते. काहींनी चाचणीची जुनी प्रमाणपत्रे दाखवली, पण त्यांची नव्याने चाचणी करण्यात आली.

चौकट

अर्धांगवायूच्या दीक्षितांना उचलून बाहेर आणले

पंचावन्न वर्षीय चंद्रकांत दीक्षितांना अर्धांगवायू झाला आहे. शुक्रवारी पूर येेताना साऱ्यांनी घरे सोडली. दीक्षितांनाही उचलून बाहेर आणावे लागले. शाळेत एका वर्गखोलीत त्यांना झोपवले आहे.

कोट

संसार गेला, पुन्हा उभारावा लागेल

२०१९ मधील पुरात ५०-६० हजारांचे नुकसान झाले होते. यावर्षीही पुराने घर झाडून नेले. आता पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागेल. दरवर्षीच्या पुरामुळे मेटाकुटीला आलोय.

- सिद्धव्वा मोरे

पुराने घरालाच वेढा दिला. कच्च्याबच्च्यांसह धावत घराबाहेर पडलो. शाळेत रात्र काढली. आता पूर ओसरण्याची वाट पाहतोय. घराचे नुकसान पाहवणारे नसेल.

- सारिका मुत्तुडकर

Web Title: Krishna came dancing and took Kidukmiduk with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.